ई-गव्हर्नन्स, ‘आयटी हब’ला प्राधान्य
By Admin | Updated: October 16, 2015 00:39 IST2015-10-16T00:24:37+5:302015-10-16T00:39:45+5:30
‘लोकमत’शी थेट संवाद : सतेज पाटील यांचा हायटेक कोल्हापूरचा मानस; पारदर्शी, जलद सेवेसाठी आॅनलाईन कामकाज

ई-गव्हर्नन्स, ‘आयटी हब’ला प्राधान्य
कोल्हापूर : ‘शहरातील नागरिकांना महानगरपालिकेच्या कोणत्याही यंत्रणेकडून त्रास होणार नाही, याची खबरदारी म्हणून संपूर्ण कामकाज आॅनलाईन करण्याचा विचार असून, पुढील पाच वर्षांत आमचा सगळा भर ‘ई-गव्हर्नन्स’वर असेल; तसेच ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश होण्यासाठी ‘आयटी हब’ला प्राधान्य दिले जाईल,’ अशी माहिती माजी गृहराज्यमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला मुलाखत देताना दिली. सत्तेवर येताच पुढील सहा महिन्यांत शहराच्या विविध ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत महानगरपालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात आळा घातला. प्रशासकीय अडचणीमुळे अजूनही नागरिकांना कामे करून घेताना त्रास होतो, याची आम्हाला जाणीव आहे; म्हणून महापालिकेचे संपूर्ण कामकाज आॅनलाईन करण्याचा आमचा विचार आहे. एकदा का ई-गव्हर्नन्सची संकल्पना सत्यात उतरली की मग भ्रष्टाचार आणखी कमी होईल. नागरिकांची कामे पारदर्शकपणे आणि झटपट होतील, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
आम्ही महापालिकेचा एक ‘अॅप’ तयार करणार आहोत. या अॅपवर नागरिकांनी आपली कामे टाइप करून टाकली की, त्यांची तातडीने दखल घेऊन ती केली जातील. शहरातील कोणत्याही भागातील तक्रारी, समस्या असतील आणि त्या अॅपवर टाकल्या की त्या महापालिकेच्या संबंधित विभागाकडे जातील. अॅपवर आलेली सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्याकडे जाईल. त्यानुसार अधिकारी कामे करतील. काही चुकीचे घडत असेल तर त्याचीही माहिती अॅपवर टाकली तर त्याची दखल घेतली जाईल. पेपरलेस प्रशासनाकडे आमची वाटचाल राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
‘आयटी हब’ला प्राधान्य
स्मार्ट सिटीत महापालिकेचा समावेश व्हावा म्हणून पुढील काळात शहरात ‘आयटी हब’ (माहिती व तंत्रज्ञानाचे जाळे) निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांत पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले होते. असेच प्राधान्य आयटी हबच्या बाबतीत राहील. प्रसंगी मिळकत कर कमी करावा लागला तरी तो आम्ही कमी करू. सध्या कोल्हापुरात ०.५० टक्के मिळकत कर आहे; पण तोच पुण्यात ०.३० टक्के आहे. जर पुण्यात कर कमी असेल तर तो आपणालाही कमी करावा लागणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
सुरक्षित शहराकडे वाटचाल
कोल्हापूरने गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षित शहराकडे
(सेफ सिटी) वाटचाल केली आहे. त्यासाठी येत्या तीन वर्षांत आम्ही संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहोत. तीन वर्षे एवढ्यासाठी म्हणतोय की, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सोपे आहे; परंतु त्याचा डाटा आॅनलाईन करणे हे काम अवघड आहे. कॅमेऱ्यांत चित्रित होणारे चित्र अधिक स्पष्ट आणि पोलीस तपासात मदत करील,
अशा प्रकारचे असेल असे तंत्रज्ञान
त्या कॅमेऱ्यात असेल. या कामात शहरातील नागरिकांचेही सहकार्य घेतले जाईल. महापालिका प्रशासनासह खासगी मालकीचेही सीसीटीव्ही कॅमरे बसविले जावेत यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे पाटील म्हणाले.
उद्याने, मैदाने विकसित करू
शहरातील उद्याने तसेच मैदाने यांच्यासाठी काही जागा राखीव आहेत. विशेषत: उपनगरांतील जागा त्यासाठी विकसित केल्या जातील. राज्यातील आरक्षणातील जागांच्या विकासाकरिता राज्य सरकारचे एक धोरण निश्चित केले जात आहे. तोपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माध्यमातून निधी उपलब्ध केले जातील. आरक्षणातील सर्व जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची एक योजनाबद्ध मोहीम उघडली जाईल, असे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी स्वच्छतागृहे
महापालिकेत सत्तेत आल्यावर पुढच्या सहा महिन्यांत शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा निर्धार केला असल्याचे पाटील यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी एक आराखडा तयार केला आहे. तो शंभर टक्के अमलात आणला जाईल. त्यामुळे स्वच्छतागृह नसल्याने महिलांची गैरसोय होणार नाही, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
महाडिकांवर
आमचेच उपकार
मला आमदार केल्याचे महाडिक सांगत सुटले आहेत; पण मी त्यांची एक आठवण करून देतो. त्यांनी विधान परिषदेची पहिली निवडणूक लढविली, त्यावेळी मीच त्यांना मदत केली होती. ते दुपारचे झोपलेले असायचे; पण मी मात्र त्यांच्यासाठी पळत होतो. आम्ही त्यांच्यावर उपकार केले म्हणूनच ते आमदार झाले, असे सांगून सतेज पाटील म्हणाले की, महाडिक हे काही स्वकर्तृत्वातून मोठे झालेले राजकारणी नाहीत. वैयक्तिक ताकदीवर निवडून यायला ते काही राजू शेट्टी नाहीत की बाळासाहेब माने यांच्यासारखे लोकप्रिय नेतेही नाहीत. बाळासाहेब माने, रत्नाप्पाण्णा कुंभार, राजू शेट्टी यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यांचा महाडिक यांनी स्वत:च्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या मदतीने स्वत:चे बस्तान बसविले आहे. महाडिक यांनी उपयोग करून घेतला नाही, असा एकही नेता राहिलेला नाही.
स्वरूपची
पात्रता नाही
महाडिक कुटुंबीयांवर सतेज पाटील यांनी व्यक्तिगत पातळीवर, व्यवसायावर हल्ला केला, असा आरोप स्वरूप महाडिक यांनी केला होता, त्याकडे लक्ष वेधले असता पाटील यांनी सांगितले की, मी गेली २०-२५ वर्षे समाजकारण करतो आहे; त्यामुळे ते माझ्या पात्रतेचे नाहीत. त्यामुळे स्वरूप महाडिक यांच्या टीकेला उत्तर देऊन त्यांना माझ्या पंगतीत बसवायचे का, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्यांची टीका ही अपरिपक्वपणाची आहे. जो माणूस मुलाखतीसाठी तीन तास सुनील मोदींची ट्युशन लावतो, अशा उद्योगधंद्यातील माणसाला राजकारण कळायला वेळ लागेल.
मटका घेणारे
महाडिक कोण?
महाडिकांनी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान तुम्हाला दिले आहे, याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, मी एका व्यासपीठावर यायला तयार आहे. मात्र, तत्पूर्वी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत. शाहूपुरीत मटका घेताना सापडलेले महादेव महाडिक कोण? कोल्हापूर आइस फॅ क्टरीचे मालक कोण? आणि ‘गोकुळ’मध्ये तुमचे टॅँकर किती आहेत? या तीन साध्या, सरळ प्रश्नांची आधी त्यांनी उत्तरे जाहीरपणे द्यावीत. मग एका व्यासपीठावर
येण्याचे पाहू.
आमचा पक्ष
आमची भूमिका
पुढच्या पाच वर्षांत काय करणार ?
शहरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा
प्रयत्न केला. हे प्रयत्न असेच सुरू राहतील.
शहरातील वाहतुकीला तसेच पार्किंगचे नियोजन करण्यास प्राधान्य देणार
४काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण करणार
शहरांतर्गत वितरण नलिका मोठ्या प्रमाणात बदलणार
आरक्षणातील जागांचा
विकास करणार