‘डीवायपी सिटी’ने कोल्हापूरच्या वैभवात भर
By Admin | Updated: September 26, 2015 00:42 IST2015-09-26T00:42:24+5:302015-09-26T00:42:24+5:30
सुशीलकुमार शिंदे यांचे मत : ‘शॉपर्स स्टॉप स्टोअर’चा प्रारंभ; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

‘डीवायपी सिटी’ने कोल्हापूरच्या वैभवात भर
कोल्हापूर : राजेशाही वैभव असलेले कोल्हापूर आता आधुनिक वैभवाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या वैभवात ‘डीवायपी सिटी’ची भर पडली आहे. मूळचे शेतकरी असलेल्या डी. वाय. पाटील कुटुंबीयांची शिक्षण, आरोग्य, क्रीडा, आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी ग्रामीण भागातील चांगल्या नेतृत्वाचे दर्शन घडविते. ‘डीवायपी सिटी’तील ‘शॉपर्स स्टॉप स्टोअर’ कोल्हापूरकरांना निश्चितपणे आकर्षित करील, असा विश्वास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.फॅशन रिटेलर क्षेत्रातील येथील शॉपर्स स्टॉप स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, ‘शॉपर्स स्टॉप’चे संचालक रवी रहेजा, व्यवस्थापकीय निर्देशक गोविंद श्रीखंडे, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील प्रमुख उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती आणि पाश्चिमात्य संगीताच्या तालावर उत्तरोत्तर रंगलेल्या शानदार सोहळ्याद्वारे ‘शॉपर्स स्टॉप’च्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन झाले.
माजी केंद्रीय मंत्री शिंदे म्हणाले, ‘डीवायपी सिटी’ने कोल्हापुरात सुरेख कॉम्प्लेक्स साकारले असून, ते पाहून अमेरिकेत असल्यासारखे वाटले. या सिटीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या वैभवात भर टाकण्याचे काम संजय व सतेज पाटील यांनी केले आहे. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, माझ्या मुलांबरोबर नातवंडे देखील कोल्हापूरच्या विकासाला पूरक ठरेल, अशा प्रकल्प, उपक्रमांद्वारे प्रगतीची पावले टाकत आहेत. ते माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, शांतादेवी डी. पाटील, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, बांधकाम व्यावसायिक राजीव परीख, उद्योगपती जितुभाई गांधी, आशिष कोरगावकर, नगरसेवक विजय सूर्यवंशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिंदे पंतप्रधान...
निवडणुका झाल्या तर निष्ठावंत आणि तत्त्वनिष्ठ असलेले सुशीलकुमार शिंदे हे पंतप्रधान होतील, अशी अपेक्षा माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, राजकीय, सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटविणारे शिंदे यांनी पंतप्रधान झाल्यानंतर शेती विकासाला प्राधान्य द्यावे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांनी विधानसभेत
डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी व्यतित केलेल्या क्षणांची आठवण सांगितली.