फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
By Admin | Updated: November 9, 2016 00:56 IST2016-11-08T23:32:31+5:302016-11-09T00:56:38+5:30
शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार : रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथील दुर्घटना

फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू
रत्नागिरी : डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे घडला. फासकीत अडकलेला बिबट्या झाडाला लटकून राहिला होता. परिक्षेत्र वन अधिकारी बी. आर. पाटील, वनपाल एल. बी. गुरव व त्यांच्या पथकाने शवविच्छेदन करून बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.
नेवरे येथील द्वारकानाथ रसाळ नावाची व्यक्ती बेपत्ता झाली होती. सोमवारी सायंकाळपर्यंत ते घरी न आल्यामुळे त्यांचे कुटुंबीय व वाडीतील मंडळी रात्रभर शोध घेत होती. आजूबाजूचा संपूर्ण परिसर वाडीतील मंडळींनी पिंजून काढला. तरीही ते सापडले नाहीत. पहाटेच्या सुमारास रसाळवाडी येथील लेकीचं तळे परिसरात शोध घेत असताना झाडावरील फासकीत बिबट्या लोकांना अडकलेला दिसला.
भयभीत झालेल्या मंडळींसह उपसरपंच रामचंद्र रसाळ यांनी तातडीने वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वन अधिकारी व त्यांचे सर्व पथक लगेचच नेवरेत दाखल झाले. फासकीत अडकलेला बिबट्या झाडामध्ये फसला होता. फासकीचा दोर अडकल्यामुळे बाहेर पडण्याच्या
प्रयत्नात बिबट्याचा दोर आवळला गेल्यामुळे तो मृत्युमुखी पडला असावा, असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. परिक्षेत्र वन अधिकारी बी. आर. पाटील यांनी पंचनामा करून मृत बिबट्यालाफासकीतून सोडवून शवविच्छेदन केले. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपाल एल. बी. गुरव, वनरक्षक एन. एस. गावडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
११ बिबट्यांचा मृत्यू
गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १७ बिबटे सापडले. त्यापैकी ११ बिबट्यांचा मृत्यू झाला होता, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सहा बिबट्यांना वन विभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.