उजाडली परिसर स्वच्छतेची पहाट !

By Admin | Updated: October 2, 2014 23:32 IST2014-10-02T23:20:06+5:302014-10-02T23:32:29+5:30

‘स्वच्छ भारत’ अभियान : शाळा, महाविद्यालये, संस्था, महापालिका, जिल्हापरिषद, शासकीय कार्यालयांनी राबविली मोहीम

Dusty morning cleanliness atmosphere! | उजाडली परिसर स्वच्छतेची पहाट !

उजाडली परिसर स्वच्छतेची पहाट !

कोल्हापूर : अहिंसेद्वारे जगाला शांततेची शिकवण देणारे महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाला प्रतिसाद देत शहरातील अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था, जिल्हा परिषद , महापालिका, शासकीय कार्यालये यांनी आपला परिसर स्वच्छ केला. याचबरोबर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही जयंती साजरी करण्यात आली.
आज, गुरुवारी स्वच्छता अभियान राबविणाऱ्यांमध्ये आबासो सासने विद्यालय, विद्यामंदिर, सोमवार पेठ, विद्यापीठ हायस्कूल, म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूल, क्रांतिज्योती महात्मा फुले हायस्कूल, एस्तेर पॅटन हायस्कूल, इंदिरा गांधी विद्यानिकेतन, न्यू प्राथमिक विद्यालय, मौलाना अबुलकलाम आझाद उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौ. सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल, श्रीमती आनंदीबाई नारायणराव सरदेसाई हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, सौ. शीलादेवी शिंदे सरकार हायस्कूल, नानासाहेब गद्रे हायस्कूल, दत्ताबाळ विद्यामंदिर, रॉयल इंग्लिश स्कूल (उचगाव) या शाळांचा समावेश होता; तर भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, बाळासाहेब खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय, शाहू कॉलेज, विवेकांनद कॉलेज, महात्मा जोतीराव फुले कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयांचा समावेश होता. जिल्हा परिषद, समाजकल्याण विभाग, रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर डाक वस्तू भांडार, भारतीय जनता पार्टी, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, आदींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
विद्यापीठ झाले चकाचक...
‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ असा संदेश देत महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी शिवाजी विद्यापीठात सुमारे दीड हजार विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारी विशेष स्वच्छता अभियान राबविले. विद्यापीठातील विविध विभाग, इमारतींचा परिसर, रस्ते श्रमदानातून चकाचक करून गांधीजींना अभिवादन केले.
विद्यापीठात गेल्या वर्र्षीपासूनच महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याला यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’ची जोड मिळाली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत सकाळी साडेसात वाजता अभियानाला सुरुवात झाली. अडीच तासांच्या या विशेष स्वच्छता अभियानात विद्यापीठातील विविध अधिविभागांच्या इमारती, प्रशासकीय इमारती व रस्ते चकाचक झाले. अभियानात कुलगुरू डॉ. पवार, प्र-कुलगुरू डॉ. ए. एस. भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. ए. बी. राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील यांच्यासह उपकुलसचिव, सहायक कुलसचिव, आदी सहभागी झाले होते.
महापालिकेतर्फे अभियानास सुरुवात
महापौर तृप्ती माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी मैदान येथील महात्मा गांधी यांचा पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली. आज गांंधी जयंतीपासून राबविण्यात येत असलेले ‘स्वच्छ भारत’ अभियान ३१ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात शहरातील मैदाने, रस्ते, शौचालये व मुताऱ्या, रंकाळा, पंचगंगा घाट, पुतळे व चौकांची स्वच्छता केली जाणार असून, महापालिकेच्या सर्व यंत्रणेसह नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी यावेळी केले.
यावेळी एक हजार कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. महापालिकेने होर्डिंग्ज उभी करून मोहिमेचे प्रबोधन केले आहे.

रेल्वे स्टेशन चकाचक
हजारो प्रवाशांची ये-जा असल्याने छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स या रेल्वे स्थानकावर साहजिकच कचऱ्याची समस्या असल्याने रेल्वे स्थानकांवर उतरल्यानंतर नाक मुरडून जावे लागत असे; परंतु आज, गुरुवारी रेल्वे स्थानकाच्या सफाईसाठी, खुद्द रेल्वे अधिकारीच उतरल्याने रेल्वे स्थानक चकाचक झाले. यामध्ये रेल्वेचे पुण्याचे ए. एम. गुड्स ए. के. पाठक, मिरजेचे एडीएमआई जी. एन. मीना यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी पाठक म्हणाले, आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसर व सार्वजनिक जागाही स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. रेल्वे स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रथम प्रवाशांमध्ये जनजागृती केली पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

Web Title: Dusty morning cleanliness atmosphere!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.