‘दौलत’च्या विक्रीत ‘थिटे पेपर्स’चा खोडा

By Admin | Updated: August 23, 2015 17:53 IST2015-08-23T17:52:08+5:302015-08-23T17:53:32+5:30

नव्याने पेच : ‘शिवशक्ती’, ‘तासगांवकर शुगर्स’च्या निविदा दाखल

Dugout of Thought Papers at Daulat's sale | ‘दौलत’च्या विक्रीत ‘थिटे पेपर्स’चा खोडा

‘दौलत’च्या विक्रीत ‘थिटे पेपर्स’चा खोडा

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी शनिवारी ‘शिवशक्ती शुगर्स’, ‘अथणी व तासगांवकर शुगर्स’, मुंबई यांनी निविदा दाखल केल्या. या निविदा सोमवारी (दि. २४) उघडल्या जाणार आहेत, पण उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेविरोधात थिटे पेपर्स सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे ‘दौलत’च्या विक्रीत ‘थिटे’चा खोडा पडण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या थकीत ६२ कोटी कर्जापोटी ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने बॅँकेने कारखाना विक्रीस काढला आहे. जिल्हा बॅँकेने कारखान्यांची २२० कोटी राखीव किंमत सांगितली आहे. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर खासदार प्रभाकर कोरे यांच्या ‘शिवशक्ती’ शुगर्स, तासगांवकर शुगर्स व आमदार संजय पाटील यांनी निविदा फॉर्म घेतले होते पण त्यापैकी शनिवारी अखेरच्या दिवशी ‘शिवशक्ती’ व तासगांवकर शुगर्स यांनी निविदा दाखल केल्या. या निविदा सोमवारी उघडण्यात येणार आहेत.
दरम्यान, ‘दौलत’चा ताबा जिल्हा बॅँकेचा की थिटे पेपर्स, प्रा. लि. नाशिक हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला होता. २५ मार्च २०१५ ला उच्च न्यायालयाने थिटे पेपर्सची याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात थिटे पेपर्स सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. ही याचिका सर्वाेच्च न्यायालयाने दाखल करून घेतली असून ‘दौलत’ कारखान्याची विक्रीबाबत जिल्हा बँकेने सुरू केलेली प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे थिटे पेपर्सने नोटिसीद्वारे म्हटले आहे.
प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विक्रीची प्रक्रिया सुरू करणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर साखर कारखाना तातडीने सुरू करण्यात येईल शिवाय या कारखान्याबाबतचे अपील प्रलंबित असताना हा कारखाना कोणी चालवावा, त्या संबंधित काही अधिकार घेतल्यास ते अधिकार हे पूर्णपणे बेकायदेशीर व सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे असेल. त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा थिटे पेपर्स प्रा. लि. कंपनीने जिल्हा बॅँकेला दिला आहे. त्यामुळे ‘दौलत’ विक्रीसमोर नव्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) ि
थटेंचा बोलविता धनी कोण?
थिटे पेपर्स ही नाशिकची कंपनी, ‘कर्नाटकच्या सीमेवर असलेला ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर घेतला कसा व केव्हा? याविषयी सुरुवातीपासूनच चंदगड तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यात गेले चार वर्षांत कारखाना सुरू व्हावा म्हणून कोणीच प्रयत्न केले नाहीत, पण सुरुवातीला भाडेतत्त्वावर देण्यास आणि आता विक्रीस विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे थिटेंचा बोलविता धनी कोण? याविषयी सध्या बॅँकेच्या वर्तुळात जोरात चर्चा सुरू आहे.

Web Title: Dugout of Thought Papers at Daulat's sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.