सुरळीत ऊसतोडणीमुळे चाऱ्याचा प्रश्न निकाली
By Admin | Updated: November 21, 2015 00:14 IST2015-11-20T20:46:02+5:302015-11-21T00:14:51+5:30
कारखान गट आॅफिसवर गर्दी : ऊस लवकर जाणयासाठी प्रयत्न, रस्ते ऊस वाहतुकीच्या वाहनांनी गजबजले

सुरळीत ऊसतोडणीमुळे चाऱ्याचा प्रश्न निकाली
संजय पाटील -- सरूड --सध्या ग्रामीण भागामध्ये गेल्या १५ दिवसांपासून ऊस तोडणी सुरळीत चालू असल्यामुळे जनावरांना लागणाऱ्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न उसाच्या वाड्याच्या माध्यमातून सुटला आहे. ऊस उत्पादनात घट होत असली तरी शेतकरी वर्गाचे लक्ष चालू वर्षी उसाला किती ‘एफआरपी’ जाहीर होते व आपला ऊस कारखान्यास कसा लवकर घालवून अन्य पीक कसे घेता येईल, याकडे लागले असल्याचे चित्र आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध शेतकरी संघटना व शासन कारखानदार यांच्यात ऊसदरावरून आंदोलने होत होती. त्याकाळी आधी आंदोलन व त्यानंतरच कारखाने चालू असे चित्र बनले होते. त्याचा परिणाम समाजातील सर्वच घटकांवर होत होता. शासन व कारखानदार यांच्या आडमुठ्या धोरणामुळे ऊस दर जाहीर होण्यास विलंब लागत होता. आंदोलन तीव्र झाली की मात्र शासन जागे होत होते व विविध शेतकरी संघटना जो म्हणेल तो दर मान्य करून कारखाने दीड महिना उशिरा चालू होत होते. परंतु, निव्वळ मोलमजुरी तसेच ऊस तोडणीवर उदरनिर्वाह करणारे सर्वसामान्य लोक, तसेच शेतकरी वर्ग यांच्यावरती विपरीत परिणाम होत होता. कारखाने चालू नसल्यामुळे लोकांच्या हाताला काम नव्हते. त्याचा परिणाम गावागावांतील विविध व्यापारी वर्गावर होत होता.
परंतु, चालू वर्षी मात्र गेल्या अनेक वर्षापेक्षा चित्र वेगळे दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कारखाने विना आंदोलन करता चालू झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सध्या शांततेच्या मार्गाने यावरती तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसेंबरपर्यंत या संघटनेने शासन, कारखानदार यांच्याकडून गतवर्षी गेलेल्या उसाचे बिल ‘एफआरपी’प्रमाणे देऊन चालू गळीत हंगामासाठी शासन, कारखानदार किती ‘एफआरपी’ जाहीर करणार? अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. जर शासन अपेक्षित दर जाहीर करणार नसेल तर अपेक्षित दर मिळविण्यासाठी योग्य मार्गाने पावले उचलली जातील, असा इशाराही या निमित्ताने ‘स्वाभिमानी’ने दिला आहे. चालू वर्षी पावसाचे घटलेले प्रमाण लक्षात घेता ऊस उताऱ्यावर देखील कमालीचा परिणाम झाला आहे. त्यातच वाढती महागाई, आर्थिक टंचाई यासारख्या समस्या जनतेसमोर आवासून उभ्या आहेत. ग्रामीण पट्ट्यात मात्र चालू वर्षी सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मात्र, ऊसतोडी चालू झाल्यामुळे उसाचे वाडे विकून का होईना घरसंसार चालवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकूणच चालू वर्षी ऊसतोडी व कारखाने लवकर चालू झाल्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. ग्रामीण भागात मोलमजुरी करणारी काही कुटुंबे आहेत, त्यांच्यातही चैतन्याचे वातावरण आहे. परंतु, शेतकरी वर्गाचे लक्ष चालू वर्षाच्या ‘एफआरपी’कडे लागले असल्याचे चित्र दिसत आहे.