सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा
By Admin | Updated: December 9, 2014 23:55 IST2014-12-09T23:29:45+5:302014-12-09T23:55:49+5:30
सौंदर्य काळवंडले : तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज, पुन्हा जलपर्णीचा धोका

सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा
कोल्हापूर : शाम सोसायटी, सरनाईक कॉलनी, परताळा नाल्यातून मोठ्या प्रमाणात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याचा जीव पुन्हा एकदा गुदमरू लागला आहे. पाण्यावर हिवरट काळसर रंगाचा तवंग साचू लागल्याने रंकाळ्यातील जीवसृष्टीलाच धोका निर्माण होऊन तलावाला अवकळा आली आहे. याकडे गांभीर्याने पाहत वेळीच उपाययोजना न केल्यास पुन्हा रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरणही अशक्य असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.
रंकाळ्यात मिसळणाऱ्या ११ ते १२ एमएलडी (दशलक्ष लिटर) मैलामिश्रीत सांडपाण्यापैकी तब्बल १० एमएलडी सांडपाणी दुधाळी नाल्याकडे वळविल्याचा मनपाचा दावा आहे. मात्र, सव्वा चार कोटी रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेजलाईन पूर्ण क्षमतेने सुरूच झाली नाही. पाईपमधील अडकलेल्या खरमातीमुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी पुन्हा मिसळत आहे. सांडपाणी व हवेतील उष्णतेमुळे रंकाळ्याला पुन्हा जलपर्णीचा धोक उद्भवणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याची राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेतून महापालिकेला ४ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला; पण गेली पाच वर्षे ही योजना रखडली. रंकाळा टॉवर ते जुना वाशी नाका येथील ड्रेनेजसाठी पाईपलाईनचे काम रखडल्याने रंकाळ्याचे दुखणे वाढतच गेले. अद्याप सरनाईक कॉलनी नाल्यातील एक ते दीड एमएलडी सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत आहे. त्यामुळे सांडपाण्यापासून पूर्णपणे सुटका झालेली नाही. दूषित पाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्यावर तेलकट तवंग साचू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असलेल्या रंकाळा मरणासन्न झाला आहे.(प्रतिनिधी)
महानगरपालिकेचे जुजबी प्रयत्न...
रंकाळ्यात मिसळणारे पाणी रोखण्यासाठी मातीची पोती भरून दूषित पाणी वेगळे करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. महापालिकेने योजलेल्या या तकलादू प्रयत्नांमुळेच पाण्यावर तेलकट तवंग गोळा होऊ लागला आहे. पाण्याची दुर्गंधी सुटून जलपर्णीचा धोका वाढणार आहे. तसेच संरक्षक भिंत तीन ठिकाणी पडली आहे. पैसे व तंत्रज्ञानांचा अभाव अशा कारणांमुळे हे काम ही गेली दीड वर्षे रखडले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळ्यास बसत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे आहेत.
रंकाळ्यात साचलेला कचरा, प्रदूषणामुळे जीवसृष्टीची झालेली हानी
कोल्हापूरचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रंकाळ्याला अवकळा आली आहे. प्रदूषण, स्वच्छता, मजबुतीकरण, नैसर्गिक सौंदर्य, आदी सर्वच आघाडीवर प्रशासकीय व राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष होत आहे. परिणामी वैभवशाली रंकाळ्याच्या दुखण्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. असीम सौंदर्याचं प्रतीक असलेला संध्यामठ अखेरची घटका मोजत आहे. थेट मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी निळे-काळे झाले आहे. धुणी-भांड्यासह म्हशी धुण्यामुळे प्रदूषणात वाढच होत आहे. मंगळवारी दुपारी रंकाळ्याची सद्य:स्थिती दर्शविणारी ही काही छायाचित्रे.