टंचाईच्या भीतीने साखर दरात तेजी
By Admin | Updated: January 17, 2017 00:35 IST2017-01-17T00:35:04+5:302017-01-17T00:35:04+5:30
भीती अनाठायी : साखर कारखानदारीला मात्र चांगले दिवस

टंचाईच्या भीतीने साखर दरात तेजी
चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूर
यंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याच्या भीतीने साखरेच्या दरात तेजी आली आहे. गेल्या गुरुवारी घाऊक बाजारात साखरेला प्रतिक्विंटल ४०२० रुपये दर मिळाला. गेल्या सात वर्षांतील हा उच्चांकी दर आहे. सध्या दर ३६०० ते ३७०० रुपये (एक्स फॅक्टरी) आहे. यामुळे साखर कारखानदारीला चांगले दिवस आले आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास कारखान्यांना कर्जाची परतफेड आणि शेतकऱ्यांची थकीत बिले भागविणे सोयीचे होणार आहे.
देशातील यंदाच्या हंगामातील साखरेचे उत्पादन २३५ लाख टन होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात ते २१५ लाख टनांच्या आसपास राहील, असे दिसते. यामुळे यंदा साखरेची टंचाई जाणवणार अशी शंका व्यापाऱ्यांना येऊ लागल्याने त्यांनी साखर खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. परिणामी, घाऊक बाजारातील मागणी पुरवठ्यापेक्षा जादा होऊ लागल्याने साखरेचे दर वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या साखरेला ४०२० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा शिल्लक साठा ७७ लाख टन होता. चालू हंगामात उत्पादन २१५ लाख टन गृहित धरले तरी २९२ लाख टन साखर उपलब्ध होते. देशांतर्गत विक्री वर्षाला सुमारे २५० लाख टन आहे. त्यामुळे यंदा देशाला वर्षभर पुरेल इतकी साखर उपलब्ध होईलच, शिवाय पुढील साखर हंगामाच्या सुरुवातीला ४० ते ४२ लाख टन इतकी साखर शिल्लक राहील. त्यामुळे व्यापाऱ्यांची शंका अनाठायी आहे. साखरेच्या दरात आणखी फारशी वाढ होणार नाही, असे साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वायदे व्यवहारातील मार्जिन वाढविले
वायदे बाजारातील साखरेचे दर वाढविण्यात येत असल्याने सध्या घाऊक बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत, असे लक्षात आल्याने एनसीडीएक्सने (कमोडिटी एक्स्चेंज) दरवाढीला आळा घालण्यासाठी वायदे व्यवहारातील ५० टक्के रक्कम कारखान्यांकडे लगेच जमा करण्याचा आदेश दिला आहे. आधी हे प्रमाण ४५ टक्के इतके होते. याचाच अर्थ साखर खरेदीचा वायदा केल्यानंतर निम्मी रक्कम लगेच आणि उर्वरित साखर उचलतेवेळी द्यावी लागणार आहे.
महाराष्ट्राचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार
सलग दोन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यातच उसाला चांगला दर मिळाल्याने उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. याचा परिणाम पुढील वर्षातील महाराष्ट्रातील साखर उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात मात्र हे उत्पादन गतवर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी कमी म्हणजेच आठ लाख टनांवरून ते पाच लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.