राजकारणामुळेच सहकार डबघाईला

By Admin | Updated: February 23, 2015 00:15 IST2015-02-23T00:10:32+5:302015-02-23T00:15:18+5:30

पाटील यांची टीका : सहकारी चळवळ व ग्रामीण विकास राष्ट्रीय कार्यशाळा

Due to politics, co-operatives are scared | राजकारणामुळेच सहकार डबघाईला

राजकारणामुळेच सहकार डबघाईला

कोल्हापूर : सहकारी क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव होऊन संस्थांमध्ये आपल्या जवळच्यांची सोय लावण्याच्या वृत्तीमुळे ‘कामापेक्षा माणसंच जास्त’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सहकार डबघाईला आला आहे, अशी टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी केली.
न्यू कॉलेजतर्फे सहकारी चळवळ व ग्रामीण विकास राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे होते.
जे. एफ. पाटील म्हणाले, सहकारक्षेत्र १९८० पर्यंत सुरळीत होते. त्यानंतरच घोटाळ्यांना सुरुवात झाली. या क्षेत्रातील बदनामी ही अर्थकारणामुळे नाही तर ते चालविणाऱ्या लोकांचे बेजबाबदार व्यवस्थापन व भ्रष्टाचारामुळे झाली. अशा लोकांना निर्लज्ज, नालायक अशी कुठलीही उपमा दिली तर ती कमीच आहे. अशा वृत्तीमुळेच सर्वसामान्यांचा सहकारावरील विश्वास उडाला आहे.
साखर कारखाने आतबट्ट्यात येण्याचे प्रमुख कारण म्हणजे तिथली गेस्ट हाऊस. या ठिकाणी संचालकांकडून जेवणावळींवर होणारा वारेमाप खर्च अगणिक असतो तसेच साखर धंदा अडचणीत येण्याचे दुसरे कारण म्हणजे खुली अर्थव्यवस्था आहे. सध्या सहकारी कारखाने अडचणीत व खासगी फायद्यात अशी स्थिती आहे. हे कशामुळे झाले याचाही विचार होणे गरजेचे आहे. सहकाराचा ऱ्हास टाळण्यासाठी आपल्या उत्पादनाची स्पर्धात्मकता वाढली पाहिजे. परदेशातील अत्याधुनिक शेतीपुढे आपण कुठे ? असा प्रश्न निर्माण होतो. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी विचार करायला हवा. सहकार म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाचे माध्यम नव्हे, ती जबाबदारी सरकारची आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरेंचा खून म्हणजे चारित्र्य, संस्कार व विचारांचा खून झाला आहे. त्याचा कडवट शब्दांत निषेध झाला पाहिजे.
डॉ. एन. व्ही. नलवडे म्हणाले, कोणतीही व्यवस्था वाईट नसते ती राबविणारी प्रवृत्ती वाईट असते. शेतकरी सहकारी संघाच्या हिरव्या रंगाचा वापर करून अनेकांनी आपली दुकाने चालविली. ती चांगली चालली परंतु सर्वसामान्यांना विश्वासार्ह वाटणारा हा संघ मात्र बंद पडला. आता सहकारातून स्वाहाकार होत असल्याचे चित्र दिसत आहे. साखर कारखान्यांमधील पैसे राजकारणात वापरण्याच्या पद्धतीमुळे कारखाने मोडकळीस येत आहेत.
दिवसभरातील विविध सत्रांत प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी (इस्लामपूर), मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय (सांगली)चे प्रा. सुभाष दगडे यांचे व्याख्यान झाले. समारोप प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. बी. ककडे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. एस. के. कोरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी कार्यशाळा संयोजक डॉ. डी. जी चौगुले, उपप्राचार्य डॉ. एस. ए. बोजगार, प्रा. ए. के. सकटे, डॉ. ए. जी. सूर्यवंशी, डॉ. ए. जी. सूर्यवंशी, प्रा. डी. एस. माश्रणकर, प्रा. डॉ. डी. एम. कांबळे, प्रा. टी. के. सरगर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Due to politics, co-operatives are scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.