राम करले -बाजार भोगावशाहूवाडी दक्षिण भागातील धनगरवाडे आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलटली तरीही धनगरवाड्यांची परवड थांबलेली नाही. त्यामुळे ‘जिणं सुद्धा झालंय मरणासमान’, अशी येथील बांधवांची केविलवाणी अवस्था आहे.दक्षिण शाहूवाडी भागातील करंजफेण प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गावापासून दूर डोंगरावर सुमारे तीन कि.मी. अंतरावर करंजफेणचा धनगरवाडा आहे. वाड्यावर सरकारच्या कोणत्याही सुविधा पोहोचल्या नसल्याने आजही येथील जीवनमान मागासलेपणाचे आहे. राहायला चिखल मातीचे घर, सोबतीला १०-१२ शेळ््यांचा कळप हाच काय तो त्यांचा संसार. कळपातील एखाद-दुसरी शेळी बाजारात विकली तर गाठीला चार पैसे जमा होतात. त्याच्या आधारावरच संसाराचा गाढा चालवायचा हेच तेथील बांधवांचे आर्थिक व्यवस्थापन. हक्काची जमीन नसल्यामुळे इच्छा असूनही शेती करता येत नाही. गावात रोजगार नसल्याने तेथील तरुणमंडळी शहरात कामासाठी गेली आहेत. घरातील महिला शेळ्यांचे कळप घेऊन डोंगर-कपारित भटकत असल्याचे चित्र आहे. वाड्यापासून दूर गावात दूध डेअरी असल्याने दररोज डोंगरातून पायपीट करीत दूध घालणे अशक्य आहे. त्यामुळे दुभती जनावरे पाळण्यास टाळाटाळ केली जाते. उन्हाळी हंगामात डोंगरातून ओला चारा आणायचा कोठून? हा प्रश्न असतो.
धरगरवाड्यांची मूलभूत सुविधांअभावी परवड
By admin | Updated: July 21, 2014 00:27 IST