मुलीचे अपहरण नाट्य संपुष्टात

By Admin | Updated: November 30, 2015 01:08 IST2015-11-30T00:36:37+5:302015-11-30T01:08:57+5:30

पोलिसांनी मुलीने स्वत:च माझी कोणाविरोधात तक्रार नसल्याचे सांगितल्याने अखेर हे अपहरणनाट्य संपुष्टात आले असून, पोलीस लवकरच न्यायालयाच्या आदेशाने ही फाईल बंद करणार आहेत

Due to the kidnapping drama of the girl | मुलीचे अपहरण नाट्य संपुष्टात

मुलीचे अपहरण नाट्य संपुष्टात

सावंतवाडी : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करणारी सावंतवाडीतील अल्पवयीन मुलगी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी गूढरित्या बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्या मुलीला रविवारी सकाळी सावंतवाडीत आणण्यात आले. यावेळी तिने आपण एकटीच एसटीमधून नंदुरबार येथे काकाकडे गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता मुलीचे अपहरणनाट्य संपुष्टात आले आहे.४२ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलची मुलगी स्वयंसेवक म्हणून काम करीत होती. चार दिवस ही स्पर्धा येथील जिमखाना मैदानावर सुरू होती. मात्र, चौथ्या दिवशी ही मुलगी नाट्यमयरित्या जिमखाना मैदानावरून बेपत्ता झाली होती.तिच्या वडिलांनी येथील पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ही मुलगी नंदुरबार येथे असल्याचे निष्पन्न झाले. ही मुलगी आपल्या काकाकडे गेली होती. या मुलीला कोणी नेले तसेच तिच्यासोबत कोण होते, याची माहिती फक्त एकट्या मुलीलाच असल्याने पोलिसांनी हेडकॉन्स्टेबल प्रकाश पवार यांच्यासह तिच्या आईवडिलांना नंदुरबार येथे पाठवले होते.गुरूवारी रात्री हे कुटुंब नंदुरबारकडे जाण्यास निघाले. शुक्रवारी नंदुरबार येथे पोहोचले. त्यानंतर मुलीला घेऊन शनिवारी सावंतवाडीकडे येण्यास निघाले होते. ते रविवारी सकाळी येथे पोहोचले. यावेळी पोलिसांनी त्या मुलीचा विस्तृत जबाब घेतला. यामध्ये मला कोणीही बळजबरीने घेऊन गेले नाही. मी स्वत:च्या मनाने एसटीने नंदुरबारला गेली होती. माझ्या सोबत अन्य कोणीही नसल्याचे सांगत माझे अपहरण वगैरे काही झाले नाही. स्वखुशीने मी गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मुलीने स्वत:च माझी कोणाविरोधात तक्रार नसल्याचे सांगितल्याने अखेर हे अपहरणनाट्य संपुष्टात आले असून, पोलीस लवकरच न्यायालयाच्या आदेशाने ही फाईल बंद करणार आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कळेकर, हेडकॉन्स्टेबल माया पवार आदी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the kidnapping drama of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.