अपुऱ्या पावसाने उत्पादन घटणार
By Admin | Updated: September 8, 2015 23:39 IST2015-09-08T23:39:29+5:302015-09-08T23:39:29+5:30
आजरा पंचायत समिती सभा : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

अपुऱ्या पावसाने उत्पादन घटणार
आजरा : यावर्षी सरासरी पावसाच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला असल्याने शेती उत्पादन केवळ ३५ ते ४० टक्केच मिळणार आहे. अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशा मागणीचा ठराव आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला.सभापती विष्णूपंत केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले यांनी स्वागत केले. अपुऱ्या पावसाच्या कारणास्तव यंदा पिकस्थिती समाधानकारक नसल्याचा अहवाल तालुका कृषी अधिकारी श्रीकांत निकम यांनी मांडला. आजरा तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण वाढत असून यामुळे स्थानिक पातळीवर सुसज्ज यंत्रणेच्या अभावामुळे अनेक रूग्ण दगावण्याच्य घटना घडत असल्याचे विलास जोशिलकर यांनी स्पष्ट केले. आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना सभापती केसरकर यांनी केल्या.आजरा-गडहिंग्लज मार्गावर उत्तूर फाट्याजवळ असणारे पिकअप शेड चारचाकी वाहनांच्या अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्या पिक-अप-शेडची एस.टी. महामंडळाने दुसरीकडे व्यवस्था करावी, असे सभापती केसरकर यांनी सांगितले.गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आजरा आगारातर्फे मुंबई येथे सोडण्यात येणाऱ्या जादा बसफेऱ्यांची माहिती आगार व्यवस्थापक के. डी. मुरूकटे यांनी दिली. शिष्यवृत्तीसह विविध परीक्षांमध्ये तालुक्याने यश मिळविल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी बी. एम. कासार व शिक्षण विभागाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. सभेमध्ये विविध खात्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे, कामिनी पाटील, उपसभापती दीपक देसाई, अनिता नाईक, निर्मला व्हनबट्टे, तुळशीराम कांबळे यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
बरगे टाकून पाणी अडविणार
पावसाने पाठ फिरवल्याने आजरा तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांमध्ये बरगे टाकून पाणी अडविण्यास सुरूवात करणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अभियंता हारदे यांनी सांगितले.