दुर्लक्षामुळे रस्ता राहिला कच्चा
By Admin | Updated: November 12, 2014 00:17 IST2014-11-12T00:04:13+5:302014-11-12T00:17:18+5:30
नगरसेवकांची डोळेझाक : खड्डे बनले जीवघेणे

दुर्लक्षामुळे रस्ता राहिला कच्चा
कोल्हापूर : नगरोत्थान योजनेमधून महापालिकेने रस्ता केला, पण तो डांबरीकरणाअभावी. या संपूर्ण रस्त्यावर मोठे दगड वापरले आहेत. त्यामुळे हा रस्ता धोकादायक व जीवघेणा बनला असल्याची स्थिती संभाजीनगर परिसरातील बालाजी पार्क ते पाचगावकडे जाणाऱ्या हनुमाननगरपर्यंतच्या रस्त्याची झाली आहे. गेले दोन-अडीच वर्षे हा रस्ता आहे तसाच असून, याकडे महापालिका प्रशासनाबरोबर स्थानिक नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
ड्रेनेजवरील झाकणे ठरली स्पीडब्रेकर
हनुमाननगरपासून ते बालाजी पार्क या खराब व कच्चा रस्त्यावरील असलेल्या सुमारे दहा ड्रेनेजवरील झाकणे वरती आली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांबरोबर वाहनचालकांनाही झाकणे धोकादायक बनली आहेत. यासाठी लवकरच नवीन डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरात जाणारा शॉर्टकट रस्ता...
हा रस्ता नगरोत्थान योजनेमधून दोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता; पण या रस्त्यावर मोठे दगड वापरून करण्यात आला. यानंतर हा रस्ता आहे तसा पडून राहिला. गेल्या दोन वर्षांपासून या संपूर्ण रस्त्यावर डांबरीकरण झालेले नाही; मात्र बारीक खडी वापरली नसल्याचे दिसते. बालाजी पार्कसह जरगनगर, रामानंदनगरसह पाचगाव, रायगड व संभाजीनगर मैलखड्डा या परिसरातील वाहनचालकांची शहरात जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नेहमी वर्दळीचा हा रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
अंधार अन् अपघात...
खराब रस्त्याबरोबर या मार्गांवरील विद्युत खांबावरील रात्रीच्या वेळेत विद्युत पुरवठा खंडित आहे. त्यामुळे या काळोखाच्या अंधारात या रस्त्यावरून जाताना वाटमारीचे प्रकार होत आहे. तसेच मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो आहे.