मित्रांमुळेच तेजसची शिक्षणाची बिकट वाट ‘वहिवाट’
By Admin | Updated: August 3, 2015 00:07 IST2015-08-02T23:22:36+5:302015-08-03T00:07:58+5:30
मित्रत्वाला सलाम : आणूरमधील दोस्तांची गट्टी

मित्रांमुळेच तेजसची शिक्षणाची बिकट वाट ‘वहिवाट’
दत्तात्रय पाटील - म्हाकवे -जन्मत:च कंबरेखालील अपंगत्व आलेल्या मात्र मनामध्ये शिक्षणाची ज्योत प्रज्वलित असणाऱ्या आणूर (ता. कागल) येथील तेजस संभाजी माने या आठवीतील विद्यार्थ्यांला त्याच्या जिवाभावाच्या मित्रांमुळेच शिक्षण घेणे शक्य होत आहे.घरापासून त्याची शाळा अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्याला अपंगांसाठी असणाऱ्या सायकलने जावे लागते. ही सायकल पाठीमागून ढकलत त्याला शाळेला नेणे आणि सायंकाळी व्यवस्थित घरी पोहोचविण्याचेही काम त्याचे मित्र दररोज इमाने-इतबारे करतात. शाळेत अ-१ श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या तेजसला या मित्रांचे मिळणारे सहकार्य अनमोल आहे. त्याच्या आठ मित्रांच्या सहकार्यामुळेच तेजसला शिक्षणाची अवघड वाट ‘वहिवाट’प्रमाणे सोपी झाली आहे.
आणूर येथील तेजसच्या मित्रांनी केवळ एका दिवसापुरता ‘फे्रंडशिप’ मर्यादित न ठेवता. तो गेल्या सहा-सात वर्षांपासून चिरंतन ठेवला आहे. तेजसचे दफ्तर, डबा, पाण्याची बाटली सांभाळण्यासह त्याची सायकल ढकलत शाळेला जाताना या मित्रांना थोडेही ओझे वाटत नाही. उन्हाळ्यामध्ये सकाळी १०.३० ते ११च्या दरम्यान सायकल ढकलताना हे मित्र घामाने चिंब झालेले असतात, तर पावसाळ्यामध्ये स्वत: भिजून तेजसला मात्र सुरक्षित घरी पोहोचविण्याची जणू अलिखित जबाबदारीच या मित्रांनी घेतली आहे. तेजस पहिलीपासून मन लावून शिक्षण घेत आहे. सातवीमध्ये त्याला अ-१ श्रेणी मिळाली असून, सध्या तो महात्मा हायस्कूल, आणूर येथे शिकत आहे. घरामध्ये तो एकुलता आहे. तेजसला मित्रत्वाचा हात देणाऱ्यांमध्ये वैभव नंदकुमार माने, निखिल आप्पासो माने, समित आनंदा माने, अभिषेक बेनाडे, समाधान धोंडिराम माने, विश्वनाथ नंदकुमार पाटील, प्रथमेश भोसले, सौरभ तात्यासो गोते यांचा समावेश आहे.
तेजसला शासनाचे हवे मित्रत्व
तेजसकडे असणाऱ्या सायकलीच्या पुढील बाजूंची दोन्ही चाके खराब झाली आहेत. तेजसचे वजनही वाढले असून, त्यामुळे त्याच्या मित्रांना अधिकच त्रास होत आहे. शासनाने विचार करून तेजसला नव्याने सायकल देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
मित्रांच्या सहकार्यामुळे शिक्षणासह जगण्याची उमेद द्विगुणीत झाली आहे. शरीराने अपंगत्व असले तरी मी या मित्रांसह आई, वडील, शिक्षकांच्या प्रेरणेमुळे मनाने खूपच सुदृढ झालो आहे, असेही तेजस याने सांगितले. त्यामुळे मी सर्वांचाच ऋणी राहीन.
- तेजस संभाजी माने,
आणूर