विद्यार्थ्यांअभावी बिघडलं ‘व्यवस्थापन’शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात ९०० जागा रिक्त
By Admin | Updated: August 9, 2014 00:30 IST2014-08-08T23:46:03+5:302014-08-09T00:30:26+5:30
वाढलेली महाविद्यालये, घसरलेल्या गुणवत्तेचा बसला फटका

विद्यार्थ्यांअभावी बिघडलं ‘व्यवस्थापन’शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात ९०० जागा रिक्त
कोल्हापूर : वेतनाचे मिळणारे चांगले पॅकेज, मानमरातब, अधिकार मिळावेत आणि नामांकित उद्योग क्षेत्रांत काम करण्याच्या इच्छेतून व्यवस्थापनशास्त्र (एमबीए) अभ्यासक्रमांकडे गेल्या दहा वर्षांत विद्यार्थ्यांचा ओघ वाढला. ते ‘कॅश’ करण्यासाठी महाविद्यालयांची संख्या वाढली. पण, त्या तुलनेत गुणवत्ता कायम राहिली नसल्याने विद्यार्थ्यांचा कल घटल्याने संबंधित महाविद्यालयांतील या अभ्यासक्रमाचे ‘व्यवस्थापन’ बिघडले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रांमध्ये सुमारे ९०० जागा रिक्त राहणार असल्याचे चित्र आहे.
एमबीएची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ४४ हजार ५७८ जागांपैकी तब्बल १९ हजार ७१४ जागा रिक्त राहिल्या आहेत. मात्र, असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ एमबीए, एमएमएस इन्स्टिट्यूटतर्फे रिक्त जागांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली आहे. यातील सुमारे सहा हजार ५०० विद्यार्र्थी प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सुमारे १३ हजार जागा रिक्त राहणार आहेत.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २२ महाविद्यालये आहेत. यात कोल्हापूरमध्ये १०, सांगली ५ आणि सातारा जिल्ह्यात ७ महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांतील प्रथम आणि द्वितीय वर्षांची एकत्रित विद्यार्थी प्रवेश क्षमता सुमारे ४ हजार आहे. त्यापैकी २०१३-१४ मध्ये २ हजार ७३५ विद्यार्थी प्रवेशित झाले असून, २ हजार २६५ जागा रिक्त राहिल्या.
यावर्षी विद्यापीठातील एमबीए अधिविभागाच्या ६० जागांमधील अवघे २४ प्रवेश निश्चित झाले आहेत. उर्वरित जागांसाठी दोनवेळा ‘सीईटी’घेऊनदेखील त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुमारे ९०० जागा रिक्त राहतील, असा प्राथमिक अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. गुणवत्ता घसरल्याचा हा परिणाम आहे. (प्रतिनिधी)