नियमनमुक्तीमुळे बाजार समितींना बाधा नाही
By Admin | Updated: July 11, 2016 01:26 IST2016-07-11T01:26:53+5:302016-07-11T01:26:53+5:30
सदाभाऊ खोत : व्यापाऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही

नियमनमुक्तीमुळे बाजार समितींना बाधा नाही
सांगली : देशभरात सर्वच क्षेत्रांत खुली बाजारपेठ व्यवस्था स्वीकारली जात असताना, शेतकऱ्यांसाठी अशी व्यवस्था का असू नये, या विचारातूनच नियमनमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने बाजार समित्यांना बाधा पोहोचणार नाही. त्यामुळे बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. अशा आंदोलनाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे मत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
खोत पुढे म्हणाले की, देशातील सर्वच उद्योग क्षेत्रांत खुली बाजार व्यवस्था अस्तित्वात येत आहे. त्याचप्रमाणे बाजार समितीच्या बेड्यांमध्ये शेतकऱ्यांनाही आपल्या शेतीमालासाठी खुली व्यवस्था असावी, या हेतूने नियमनमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जुनाच असून, २००७ ला यावर चर्चा झाल्यानंतर देशातील २५ राज्यांनी तो स्वीकारला आहे. शेतकऱ्यांना जर जादा नफा मिळणार असेल, तर या धोरणाला कोणीच विरोध करायला नको. यावर विचार करण्यासाठी एक कमिटी स्थापन केली होती. यात माझ्यासह बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी, हमाल, मापाडी प्रतिनिधींचा समावेश असल्याने हा निर्णय एकतर्फी घेतलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या आंदोलनावर ते म्हणाले, व्यापारी व शेतकऱ्यांचे संबंध जुने असल्यामुळे बहुतांश माल शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडेच येणार आहे. व्यापाऱ्यांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत व्यापाऱ्यांनी भीती व्यक्त केली असल्याने व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीच स्वागत करतो. दोघांचेही नुकसान होणार नाही याची खात्री असून, व्यापाऱ्यांना बाहेर माल घेता येणार आहे. विक्री न झालेला शेतीमाल बाजार समितीतच येणार असल्याने ही भीती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
चार टक्के ‘एफआरपी’चा प्रश्न सोडवू...
राज्यात आजपर्यंत ९६ टक्के ‘एफआरपी’प्रमाणे रक्कम दिली गेली आहे. हे देशात आणि राज्यात सरकार बदलल्याचा चांगला परिणाम आहे. कारखान्यांच्या अडचणींमुळे चार टक्के ‘एफआरपी’ राहिली असली तरी केंद्राकडून येणारे टनाला ४५ रुपयांचे अनुदान आले नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. हा प्रश्न सोडविणे आवाक्याबाहेरचे वाटत नसून, सर्वांना विचारात घेऊन या प्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी ‘नाही रे’ वर्गाचाच प्रतिनिधी
शेतकरी संघटनेचा महायुतीतील सहभाग हा बळिराजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीच झाला आहे. ज्या चळवळीच्या जोरावर हे पद मिळाले, त्याला कधीही विसरणार नसून, सर्वसामान्य मातीतील ‘नाही रे’वर्गाचा प्रतिनिधी म्हणूनच मी काम करत राहणार आहे. माझ्या पदाचा उपयोग या सर्वसामान्य जनतेच्या जीवनात चार दिवस सुखाचे आणण्यासाठी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.