निवडणूक वादातून गिरगावात धुमश्चक्री
By Admin | Updated: October 12, 2014 01:06 IST2014-10-12T01:03:13+5:302014-10-12T01:06:49+5:30
सहा जखमी : सतेज-महाडिक समर्थक भिडले

निवडणूक वादातून गिरगावात धुमश्चक्री
कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या समर्थकांमध्ये आज, शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास किरकोळ वादातून धुमश्चक्री झाली. त्यामध्ये दोन्ही गटांचे मिळून सहाजण किरकोळ जखमी झाले. त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोन्ही उमेदवारांचे समर्थक रात्री उशिरा आवारात जमल्यावर वातावरण तणावपूर्ण बनले. गिरगावातही तणावपूर्ण शांतता असून, गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
या मारहाणीत यशवंत नामदेव पाटील (वय २८ ), पांडुरंग शामराव चव्हाण (४८, दोघे रा. गिरगाव परिसर), निवृत्ती ज्ञानू पाटील (३५), किरण निवृत्ती पाटील (२२), मच्छिंद्र हिंदुराव कुरणे (२२), विष्णू बापू पाटील (५५, रा. गिरगाव) असे दोन्ही गटांचे मिळून सहाजण जखमी झाले. या जखमींना ‘सीपीआर’मध्ये आणल्यावर सतेज पाटील गटाच्या वतीने माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, जिल्हा परिषद सदस्या मनीषा वास्कर, नगरसेवक विजय सूर्यवंशी, तर महाडिक गटाच्या वतीने नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, रमेश पुरेकर, महेश वासुदेव, आदी जमले होते.
यासंबंधी घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक (पान १ वरून) यांच्या प्रचारासाठी गिरगावातील मुख्य चौकात निपाणीच्या भाजपच्या आमदार शशिकला ज्वोल्ले यांना घेऊन माजी स्थायी समिती सभापती सुनील मोदी गेले होते. सभा सुरू होण्यास काही कालावधी असताना त्याच परिसरातून गावातील काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रचारफेरी काढली. ती सभेच्या ठिकाणी आल्यावर अज्ञातांनी मारलेला दगड फेरीतील कार्यकर्ते पांडुरंग चव्हाण यांना लागला. आपल्या कार्यकर्त्याला दगड लागल्याचे समजताच काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून सभेच्या ठिकाणी असलेले महाडिक समर्थक व पाटील समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये फायबरच्या शंभराहून अधिक खुर्च्यांची मोडतोड, सभामंडपाची तोडफोड व दूरचित्रवाणीचेही नुकसान झाले.
सुमारे दहा ते पंधरा मिनिटे ही धुमश्चक्री सुरू होती. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी घाबरून भीतीने पटापट दारे लावून घेतली. मारामारी सुरू झाल्याचे पाहून कोणीतरी आमदार ज्वोल्ले यांना व्यासपीठाच्या मागील बाजूस असलेल्या एका घरात सुरक्षितस्थळी बसविले व लगेच त्यांना गाडीतून कोल्हापूरला पाठविण्यात आले. हा प्रकार समजताच पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. या घटनेवेळी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची निगवे खालसा (ता. करवीर) येथे सभा होती, तर भाजपचे उमेदवार अमल महाडिकही गिरगावातील सभेला उपस्थित नव्हते.