विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2017 00:49 IST2017-07-17T00:49:15+5:302017-07-17T00:49:15+5:30
विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : विहिरीतील शाळकरी मुलाचा मृतदेह बाहेर काढताना टाकवडे (ता. शिरोळ) येथील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नांदणी (ता. शिरोळ) येथे रविवारी घडली. सुयश रविंद्र हातगिणे (वय १४, रा. नांदणी) असे शाळकरी मुलाचे तर प्रदीप उर्फ संतोष शिवाजी झुटाळ (वय ४०, रा.टाकवडे) तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली.
नांदणी (ता. शिरोळ) येथे देसकती मळा येथे आर. एस. पाटील यांच्या विहिरीत सुयश हातगिणे हा जयसिंगपूरच्या मित्रांसमवेत दुपारी एकच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. पोहताना सुयश बुडाला. यावेळी विहिरीवर असणाऱ्या त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तो पूर्ण बुडाला. ही घटना वाऱ्यासारखी नांदणी गावात पसरल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. शिरोळ पोलीसही घटनास्थळी आले. विहीर खोल असल्याने सुयशचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचण येत असल्याने टाकवडेचे संतोष झुटाळ यांना बोलाविण्यात आले. झुटाळ हे पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी पाण्याचा अंदाज घेतला. दोन वेळच्या प्रयत्नानंतर सुयश याचा मृतदेह काढण्यात त्यांना यश आले. हा मृतदेह विहिरीच्या काठावर असणाऱ्या लोकांकडे देत असतानाच संतोष झुटाळ हे पाण्यात बुडाले. यामुळे नागरिक व पोलिसांची तारांबळ उडाली. घटनास्थळी असणारे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, संतोष मिळून आला नाही. त्यामुळे औरवाड (ता. शिरोळ) येथील वजीर रेस्क्यू फोर्स या पथकाला पाचारण केल्यानंतर दोरीला लोखंडी गळ लावून मृतदेहाची शोधाशोध केली. अखेर तिसऱ्या प्रयत्नात संतोष याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती. यावेळी नातेवाइकांनी आक्रोश केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर गायकवाड करीत आहेत.
अखेरची उडी ठरली
सुयश हातगिणे हा जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये नववीत शिकत होता. मित्रांसमवेत तो विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. दोनवेळा पोहून आल्यानंतर आणखीन एक उडी घेतो, असे सांगून पुन्हा त्याने विहिरीत उडी घेतली. यामध्ये त्याचा बुडून मृत्यु झाला. त्याच्या मृत्युने परिवाराला धक्का बसला.
पोलीस हवालदारांचा साहसीपणा
दुपारी एकच्या सुमारास सुयश याचा विहिरीत बुडून मृत्यु झाल्यानंतर दुपारपर्यंत त्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला नव्हता. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास संतोष झुटाळ याने हा मृतदेह बाहेर काढला. पण त्याच पाण्यात तो बुडाला. संतोष बुडत असताना क्षणाचाही विलंब न लावता पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप यांनी विहिरीत उडी मारुन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही.
अन् संतोषवर काळाची झडप
संतोष हा विहिरीत बुडालेले मृतदेह काढण्यासाठी तरबेज होता. पोलीसमित्र म्हणूनही शिरोळ पोलिसांना घटनास्थळी विनामोबदला सेवा देत असे. कितीही खोल विहिरीत अथवा नदीत मृतदेह अडकला असेल तर शिरोळ पोलीस प्रथम संतोषला बोलावून घेत. मात्र, रविवारी संतोषवर काळाने झडप घातली अन् सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संतोषने जगातून एक्झिट घेतली. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील असा परिवार आहे. अन् संतोषवर काळाची झडप
.