पतसंस्था गटातील लढतीने ठोका चुकला
By Admin | Updated: May 8, 2015 01:05 IST2015-05-08T01:04:04+5:302015-05-08T01:05:15+5:30
अनिल पाटील यांचा थरारक विजय : निकराची झुंज... विजय... फेरमोजणी आणि जल्लोष

पतसंस्था गटातील लढतीने ठोका चुकला
कोल्हापूर : शेवटच्या मताची मोजणी होईपर्यंत ताणलेली उत्कंठा... त्यातून अनिल पाटील यांनी अवघ्या पाच मतांनी मिळविलेला विजय... फेरमतमोजणीची केलेली मागणी, त्यानंतर बनलेले तणावपूर्ण वातावरण, फेरमतमोजणीवेळी झालेली कार्यकर्त्यांची घालमेल आणि पाच मतांनी अनिल पाटील यांच्या विजयावर झालेले शिक्कामोर्तब... असा दीड तास कार्यकर्त्यांना निवडणूक यंत्रणेचा थरार पाहावयास मिळाला.
जिल्हा बॅँकेत दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित निवडणूक लढविल्याने निवडणुकीतील हवाच गेली होती. शिवसेना-भाजपने सहाजणांचे पॅनेल केले; पण खरी लढत पतसंस्था गटातील शिवसेना-भाजपचे अनिल पाटील व कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रा. जयंत पाटील यांच्यात झाली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून शह-काटशहाच्या राजकारणामुळे या गटातील निवडणूक गाजल्याने मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. विकास सेवा संस्था गटाच्या मोजणीनंतर सकाळी अकरा वाजता पतसंस्था गटाच्या मोजणीस सुरुवात झाली. राधानगरी, कागल तालुक्यांत जयंत पाटील यांनी १९ मतांची आघाडी घेत आगेकूच ठेवली. ‘करवीर’मध्ये अवघ्या ११ मतांची आघाडी मिळाल्यानंतर सर्वांच्या नजरा शिरोळ व हातकणंगले तालुक्यांकडे लागल्या. शिरोळमध्ये जयंत पाटील यांनी ६० मते घेत सहा मतांची येथेही आघाडी घेतली. हातकणंगलेमध्ये अनिल पाटील यांनी तीन मते जादा घेत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. गगनबावड्यात चारपैकी तीन मते घेत अनिल पाटील यांनी लढतीत रंगत आणली. गडहिंग्लज व शाहूवाडी तालुक्यांनी अनिल पाटील यांना साथ देऊनही जयंत पाटील यांचे पारडे जड राहिले. चंदगडमध्ये अनिल पाटील यांनी अनपेक्षितपणे २८ चे मताधिक्य घेत लढतीतील आव्हान कायम ठेवले. आजऱ्यामध्ये २५ मते जादा घेऊन जयंत पाटील यांना घाम फोडला. केवळ भुदरगड तालुक्याची मोजणी शिल्लक असताना अनिल पाटील अवघ्या १३ मतांनी आघाडीवर होते. सर्वांच्या नजरा भुदरगडच्या पेटीकडे लागल्या. इतर गटांतील विजयी उमेदवार गुलाल उधळीत असताना येथे मात्र दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची घालमेल दिसत होती. भुदरगडची मतमोजणी सुरू झाली आणि हिशेबासाठी कार्यकर्त्यांचे पेन सरसावले. या पेटीत जयंत पाटील यांना ३०, तर अनिल पाटील यांना २२ मते मिळाली. पाच मतांनी अनिल पाटील यांनी बाजी मारली आणि पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला; पण जयंत पाटील यांनी फेरमोजणीची मागणी केल्याने जल्लोष थांबला. पुन्हा मोजणी सुरू झाली.
डोळ्यांत तेल घालून दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतपत्रिकेवरील शिक्के पाहत होते. दोन-तीन मतपत्रिकांबाबत हरकती घेतल्याने तणाव वाढला. कागल तालुक्यात एक मत कमी पडले, तर शिरोळमध्ये एक मत वाढल्याने पुन्हा अनिल पाटील पाच मतांनी विजयी झाल्याचे घोषित केले आणि पाटील समर्थकांनी एकच जल्लोष केला.
१ मताने आणि ८ मतांनी आम्हीच विजयी
भुदरगडची मोजणी झाल्यानंतर दोन्ही गटांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. एका मताने निवडून आल्याचे अनिल पाटील समर्थक सुनील मोदी सांगत होते; तर आठ मतांनी आपणच निवडून आल्याने जयंत पाटील समर्थक सांगत असल्याने गोंधळ उडाला.
तालुकाअनिल जयंत
पाटील पाटील
आजरा४६२१
चंदगड ४११३
राधानगरी२२३०
कागल४६५७
हातकणंगले११६११३
करवीर१४६१५७
गगनबावडा३१
शिरोळ५४६०
पन्हाळा४१५५
शाहूवाडी १८१६
भुदरगड२२३०
गडहिंग्लज५५३१