सौदे बंदमुळे कांदा शेतकरी आक्रमक
By Admin | Updated: December 23, 2014 00:44 IST2014-12-23T00:42:39+5:302014-12-23T00:44:45+5:30
अडतला स्थगिती : सौदे पूर्ववत; तोलाईच्या तिढ्याने सौद्यावर साशंकतेचे ढग

सौदे बंदमुळे कांदा शेतकरी आक्रमक
कोल्हापूर : कांद्याचे सौदे व्यापाऱ्यांनी अचानक बंद केल्याने आक्रमक शेतकऱ्यांनी बाजार समितीवर चाल करत व्यापाऱ्यांसह समिती प्रशासनाला धारेवर धरले. अखेर अडत निर्णय स्थगिती दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी सौदे पूर्ववत सुरू केले. गुळाचे सौदे उद्या, मंगळवारी सुरू करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी घेतली असली तरी तोलाईवरून सौद्यावर साशंकतेचे ढग कायम आहेत.
शेतीमाल विक्रीची अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे आदेश पणन संचालकांनी घेतल्याने व्यापाऱ्यांनी सौदे बंदचे हत्यार उपसले. दरातील घसरणीमुळे गुळाचे सौदे गेले आठ दिवस बंद आहेत. त्यात हा निर्णय झाल्याने त्यांनी आज, सोमवारी सौदे काढलेच नाहीत.
कांदा-बटाटा, भाजीपाला-फळे यांनी शेतकऱ्यांना कल्पना दिली नसल्याने त्यांचे नुकसान होऊ नयेत म्हणून सौदे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कांदा उत्पादक शेतकरी माल घेऊन पहाटे बाजार समितीत आले. सौदे सुरू होण्याच्या वेळेस व्यापाऱ्यांनी अचानक सौदे काढण्यास नकार दिल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी १५० ते २०० शेतकऱ्यांनी आपला मोर्चा समिती कार्यालयावर वळवला. आम्ही २०० किलोमीटर रात्रभर प्रवास करत येथे माल घेऊन आलो असताना अचानक सौदे बंद करणे योग्य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रत्येक वेळी व्यापाऱ्यांची मग्रुरी ऐकणार नसल्याचे सुनावत सौदे सुरू करा; अन्यथा कार्यालय सोडणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यानंतर समितीचे प्रशासक रंजन लाखे व सहायक सचिव मोहन सालपे यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून सौदे सुरू करण्याची सूचना केली. मात्र, अडतचा निर्णय होत नाही, तोपर्यंत सौदे सुरू करणार नसल्याचा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. तोपर्यंत पणनमंत्र्यांनी अडतच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने सौदे पूर्ववत सुरू झाले.
अडतच्या निर्णयाला स्थगिती दिली; पण तोलाईचा निर्णय कायम असल्याने आज सौदे सुरू झाले. परंतु, उद्या तोलाईदार काय भूमिका घेणार, यावरच सौदे अवलंबून राहणार आहेत. (प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
करा : रघुनाथदादा पाटील
सौदे बंद केल्याचे समजताच रघुनाथदादा पाटील समितीत आले. त्यांनी प्रशासकांना जाब विचारत अचानक सौदे बंद करण्याचा अधिकार कोणालाच नाही. बंद करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायद्याने गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रशासकांकडे केली.
तोलाईचा निर्णय आज अपेक्षित
तोलाई रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात कामगार नेते बाबा आढाव हे उद्या, मंगळवारी सरकारशी चर्चा करणार आहेत. तोपर्यंत तोलाई पूर्ववत ठेवत सौदे सुरू करण्याची तयारी समितीने केली आहे.
वसा-कराले खडाजंगी !
तीन दिवसांपूर्वी सौदा झालेला गूळ कंटेनरमध्ये भरण्यास हमालांनी नकार दिल्याने व्यापाऱ्यांनी प्रशासकांकडे तक्रार केली. याबाबत हमालांचे प्रतिनिधी गुंडा कराले यांना बोलावून प्रशासकांनी कंटेनर भरण्याची सूचना केली; पण त्यांनी नकार दिला. यावेळी विश्वास वसा व कराले यांच्यात खडाजंगी उडाली.