‘सीसीटीव्ही’मुळे जिल्ह्यात चेन स्नॅचिंगला आळा
By Admin | Updated: December 30, 2016 01:01 IST2016-12-30T01:01:11+5:302016-12-30T01:01:11+5:30
महिलाही झाल्या ‘अलर्ट’ : चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट

‘सीसीटीव्ही’मुळे जिल्ह्यात चेन स्नॅचिंगला आळा
गणेश शिंदे -- कोल्हापूर --गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात चेन स्नॅचर्सनी धुमाकूळ घातला होता. रहदारीच्या, गजबजलेल्या रस्त्यांवरही दिवसाढवळ्या घडणाऱ्या चेन स्नॅचिंगमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनही चौफेर टीकेचे धनी बनले होते. त्यानंतर मात्र, पोलिसांनी समाजात विशेषत: महिलांमध्ये केलेली जनजागृती, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे पटवून दिलेले महत्त्व आणि काही सराईत चेन स्नॅचर्सच्या आवळलेल्या मुसक्या यामुळे २०१६ मध्ये २१ चेन स्नॅचिंगच्या घटनांत २०१५ च्या तुलनेत (६७ घटना) तब्बल २०० टक्क्यांनी घट झाली.
सीसीटीव्ही परिणामकारक.
शहरात सध्या १६६ सीसीटीव्ही क ॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे या सीसीटीव्हींची पोलिस प्रशासनाला गुन्हे उकल होण्याकामी मदत झाली. गडहिंग्लज, आजरा या शहरांतही सीसीटीव्ही बसविले आहेत. इचलकरंजीतही सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. नगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर सीसीटीव्हीचा पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे. कोडोली (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीनेही सीसीटीव्ही बसविले आहेत.
सराईत गुन्हेगार पोलिसांच्या नजरेत
यंदा चेन स्नॅचिंगच्या घटना कमी घडल्या असल्या तरी सराईत गुन्हेगार पोलिसांच्या टेहळणीखाली आहेत. पण, यावर्षी या प्रकरणात किती संशयितांना अटक केली, याची माहिती पोलिस दप्तरी नोंद नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यंदा चेन स्नॅचिंगच्या घटनांत घट झाली असली तरी महिलांनी अनावश्यक दागिने घालण्याचे टाळावे. जेथे सीसीटीव्ही कॅमेरे नसतील, अशा ठिकाणी लवकर बसवावेत यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे. - प्रदीप देशपांडे,
जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.
सीसीटीव्हीमुळे उघडकीस आला खुनाचा गुन्हा...
कोल्हापुरात २१ जून २०१६ रोजी शिवाजी पुलानजीक पाटील महाराज समाधिमंदिर परिसरात परप्रांतीय तरुणीचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांना या खुनाचा छडा लावताना शहरातील सीसीटीव्हीचा आधार घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला.