पकडलेल्या चोरट्यास पोलिसाने दिले सोडून

By Admin | Updated: September 3, 2014 00:28 IST2014-09-03T00:28:27+5:302014-09-03T00:28:27+5:30

नागरिक संतप्त : आज भेट घेणार

Due to the arrests given by the police, the arrested thieves | पकडलेल्या चोरट्यास पोलिसाने दिले सोडून

पकडलेल्या चोरट्यास पोलिसाने दिले सोडून

कोल्हापूर : मोरेवाडी यशवंत कॉलनीमध्ये काल, सोमवार मध्यरात्री नागरिक साखरझोपेत असताना चौघे चोरटे कॉलनीमध्ये घुसले. त्यांची चाहुल लागताच कॉलनीतील जागरुक तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यामध्ये एकजण हाती लागला, तर तिघे पसार झाले. सापडलेल्या चोरट्याला बेदम चोप देत पोलिसाच्या ताब्यात दिले. परंतु काही वेळातच नागरिकांच्या समोरच त्या चोरट्याला पोलिसाने सोडून दिले. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून, उद्या, बुधवार पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन संबंधित पोलिसाच्या विरोधात तक्रार करणार आहेत.
मोरेवाडी परिसरात गणेशोत्सवामुळे रात्री उशिराभर नागरिक जागे असतात. काल पहाटे साडेतीनच्या सुमारास चौघे चोरटे यशवंत कॉलनीमध्ये घुसले. ते काही घरांची चाचपणी करीत असल्याची चाहुल गणेश मंडपात झोपलेल्या तरुणांना लागली. त्यांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यामध्ये अंदाजे पन्नास वर्षे वयाचा चोरटा सापडला. तर अन्य तिघेजण पसार झाले. पकडलेल्या चोरट्याला तरुणांनी बेदम चोप दिला. हा गोंधळ पाहून कॉलनीतील नागरिक व महिला बाहेर आल्या. त्यांनीही चोप दिला. त्यानंतर कंट्रोल रूमला या प्रकाराची माहिती देण्यात आली. काही वेळाने फक्त एकच कॉन्स्टेबल याठिकाणी मोटारसायकलवरून आला. पकडलेल्या चोरट्याची कॉलर पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपले अन्य तीन साथीदार पळून गेल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याच्याशी बाजूला चर्चा करून सोडून दिले.
हा प्रकार पाहून नागरिक संतप्त झाले. त्यांनी पोलिसाला याप्रकरणी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देऊन निघून गेला. पकडलेल्या चोरट्याला चक्क पोलीस सोडून देतो, या घटनेने नागरिक संतप्त झाले आहेत. उद्या ते पोलीस अधीक्षक
डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन याप्रकरणी संबंधित पोलीस कोण, त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the arrests given by the police, the arrested thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.