निपाणीत कडकडीत बंद
By Admin | Updated: July 29, 2014 00:46 IST2014-07-29T00:38:58+5:302014-07-29T00:46:06+5:30
येळ्ळूर प्रकरण : कर्नाटक पोलिसांबाबत संताप; कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

निपाणीत कडकडीत बंद
निपाणी : बेळगावजवळील येळ्ळूरमध्ये मराठी बांधवांवर झालेल्या कर्नाटक पोलिसांच्या दंडूकशाहीच्या निषेधार्थ निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेतर्फे आज, सोमवारी निपाणी बंद पुकारला. त्याला व्यावसायिकांसह मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेने केलेल्या अवाहनानुसार सकाळपासूनच निपाणी शहर आणि उपनगरांतील सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून पोलिसांनी केलेल्या दंडूकशाहीचा निषेध केला. निपाणी परिसरातील ग्रामीण मार्गावरील सर्व बसेस दिवसभर बंद होत्या. निपाणी शहरातील रिक्षासह वडाप व्यावसायिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने नेहमी गजबजलेल्या बेळगाव नाका, गुरुवार पेठ, बसस्थानक परिसर, चिकोडी रोड, मुरगूड रोड परिसरांत शांतता होती.
शहरातील सराफी बाजारपेठ, कापड दुकानदार, होलसेल दुकानदार, अडत व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनी दिवसभर बंद पाळला होता. बंदच्या पार्श्वभूमीवर निपाणीतील चौकाचौकांत पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दिवसभर निपाणी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. (प्रतिनिधी)
सांगली : येळ्ळूर येथील मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. ३१) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. एवढ्यावर केंद्र सरकारला जाग आली नाही, तर रेल रोखण्यासह म्हैसाळ येथे कर्नाटकच्या बसेस रोखण्याचे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी दिला आहे. कर्नाटक पोलीस आणि तेथील सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवारी सांगलीत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
कर्नाटकच्या बसला काळे फासले
सातारा : कर्नाटक शासनाने सीमा भागातील नागरिकांवर केलेला अन्याय व पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे पडसाद सोमवारी साताऱ्यातही उमटले. शिवसैनिकांनी सातारा बसस्थानकात जाऊन कर्नाटकच्या बसला काळे फासून निषेधाच्या घोषणाही दिल्या. कर्नाटक शासनाने सीमा भागात दहशत पसरविली आहे. तेथील पोलिसांनी येळ्ळूर येथील फलक बंदोबस्तात काढून टाकला आहे. त्याचबरोबर तेथील नागरिकांना बेदम मारहाण केली आहे. याच्या निषेधार्थ साताऱ्यातील शिवसैनिकांनी सोमवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास सातारा बसस्थानकात जाऊन आंदोलन केले. कर्नाटक राज्याच्या मुंबई-बेळगाव बसला त्यांनी लक्ष्य केले.
कर्नाटक शासनाचा इस्लामपुरात निषेध
इस्लामपूर : सीमाभागातील येळ्ळूर येथील मराठी बांधवांना कर्नाटक पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा येथील अखिल भारतीय मराठा सेवा संघ, शंभुराजे युवा क्रांती, जिजाऊ महिला क्रांती संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. तहसीलदार रूपाली सरनोबत यांना हे कर्नाटक शासनाच्या व पोलिसांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.