जिल्ह्यात चार ठिकाणी होणार ड्राय रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST2021-01-08T05:20:43+5:302021-01-08T05:20:43+5:30

कोल्हापूर : देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु होण्यापूर्वी त्याची रंगीत तालीम घेण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उद्या चार ठिकाणी ...

Dry run will be held at four places in the district | जिल्ह्यात चार ठिकाणी होणार ड्राय रन

जिल्ह्यात चार ठिकाणी होणार ड्राय रन

कोल्हापूर : देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु होण्यापूर्वी त्याची रंगीत तालीम घेण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उद्या चार ठिकाणी ही ‘ड्राय रन’ची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखालील कसबा बावडा येथील सेवा रूग्णालय, कोल्हापूर महापालिकेचे पंचगंगा रूग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लस देण्याची पूर्वतयारी नेमकी कशी झाली आहे, याची चाचणी घेण्यासाठी ‘ड्राय रन’चे आयोजन करण्यात येते. दिनांक २ जानेवारी रोजी राज्यातील चार मोठ्या शहरांमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, केवळ चार शहरांमधील नियोजनावर अवलंबून न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये नेमकी काय तयारी झाली आहे, याची खातरजमा करण्यासाठी सर्वत्र ड्राय रन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याचा संपूर्ण तपशील बुधवारी व्हीसीव्दारे होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्यात आला आहे. दुपारी सीपीआरमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई, संदीप नवांगणे यांच्यासह अधिकाऱ्यांनी व्हीसीव्दारे माहिती घेतल्यानंतर याचे नियोजन केले.

चौकट

ड्राय रन म्हणजे काय

प्रत्यक्ष लस न देता केवळ ही प्रक्रिया कशी असेल, याचे प्रात्यक्षिक घेतले जाईल.

ठराविक जणांना ठरलेल्या वेळेत बोलावण्यात येईल.

आधारकार्डच्या आधारे त्यांची ओळख पटवली जाईल.

ओळख पटल्यानंतर डमी पाेर्टलवर त्यांची नोंद केली जाईल.

लस देण्याच्या कक्षामध्ये त्यांना पाठवले जाईल.

लस देण्यात आल्याची नोंद केली जाईल.

पुढील ३० मिनिटे त्यांना निरीक्षणाखाली आरोग्य कक्षात बसवले जाईल.

चौकट

ड्राय रनचा फायदा काय

प्रत्यक्षात लसीकरणावेळी काय अडचणी उद्भवू शकतात, हे या ड्राय रनमुळे कळणार आहे. लसीकरणावेळी धावपळ होऊ नये यासाठीची ही रंगीत तालीम असून, केवळ नोंदवलेल्या व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे. या प्रक्रियेत कोणतीही कसूर राहू नये, यासाठी ड्राय रन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी कोविड अॅपवर नोंद केलेल्या २५ नागरिकांना बोलाविण्यात आले आहे.

Web Title: Dry run will be held at four places in the district