कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वसुलीची मोहीम गतिमान केली असून गांधीगिरी मार्गाने ढोल-ताशांच्या गजरात वसुली मोहीम राबविली जाणार आहे. शुक्रवारी (दि. १०) राधानगरी तालुका शेतकरी मक्का प्रक्रिया संघासह इतर थकीत संस्था संचालकांच्या दारात जाऊन ‘ठिय्या आंदोलन’ करणार आहे. गेल्यावर्षी जिल्हा बँकेने ‘टॉप थकबाकीदार’ संस्था संचालकांच्या दारात जाऊन गांधीगिरी पद्धतीने वसुली मोहीम राबविली होती. उदयसिंगराव गायकवाड साखर ऊस तोडणी-वाहतूक संस्थेचे मानसिंगराव गायकवाड, तंबाखू संघाचे सर्वेसर्वा डॉ. संजय पाटील, बीजोत्पादक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील-कौलवकर, इंदिरा-तांबाळेच्या अध्यक्षा विजयामाला देसाई यांच्या घरासमोर सनई-चौघडा वाजवून वसुली प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये बँकेची कशीबशी सव्वा कोटींची वसुली झाली होती. त्यानंतर वर्षभर बॅँकेचे प्रशासन एकदमच शांत झाले. आता मार्च महिन्याचा पहिल्या आठवडा संपल्यानंतर सनई-चौघडाऐवजी आता ढोल-ताशांचा गजर करून थकबाकीदारांची कानउघाडणी करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. राधानगरी स्टार्च कारखान्याकडे व्याजासह ३३ कोटी ४४ लाखांची थकबाकी आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजता कारखान्याचे अध्यक्ष बी. के. डोंगळे यांच्या घोटवडे (ता. राधानगरी) येथील निवासस्थानी ढोल-ताशांच्या गजरात वसुली मोहीम राबविली जाणार आहे. त्यानंतर कारखान्याच्या सर्व संचालकांच्या दारात जिल्हा बँकेचे संचालक जाणार आहे. देसाई यांच्यावर फौजदारीइंदिरा साखर कारखाना, तांबाळे (ता. भुदरगड) यांनी गेल्यावर्षी थकबाकीपोटी बँकेला १ कोटी १६ लाखांचा धनादेश दिला होता. तो न वटल्याने बँकेने कारखान्याच्या अध्यक्षा विजयामाला देसाई यांच्यावर फौजदारी दाखल केली आहे. थकबाकीदार संस्थांची वसुली मोहीम अधिक तीव्र करणार असून या संस्थांना ‘ओटीएस’मध्ये सहभागी होण्याची चांगली संधी होती. शुक्रवारी राधानगरी स्टार्च कारखाना संचालकांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहे. - आमदार हसन मुश्रीफ, अध्यक्ष, जिल्हा बँक
थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशे
By admin | Updated: March 8, 2017 00:22 IST