औषध विक्रेत्यांचा व्यवसाय बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:24 IST2021-05-19T04:24:56+5:302021-05-19T04:24:56+5:30
कोल्हापूर : कोरोनाविरोधाच्या लढाईत सर्वात अग्रभागी असून देखील केंद्र व राज्य सरकाकडून साधे कोविड योध्दा म्हणून लसीकरणात देखील प्राधान्य ...

औषध विक्रेत्यांचा व्यवसाय बंदचा इशारा
कोल्हापूर : कोरोनाविरोधाच्या लढाईत सर्वात अग्रभागी असून देखील केंद्र व राज्य सरकाकडून साधे कोविड योध्दा म्हणून लसीकरणात देखील प्राधान्य दिले जात नसल्याने औषध विक्रेत्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास व्यवसाय बंद करावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने दिला आहे.
असोसिएशनचे राज्याध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे औषध विक्रेत्यांच्या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरून आता दुसऱ्या तीव्र लाटेला सामोरे जात असतानाही औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे शासनाने दुर्लक्षच केले आहे. जिवावर उदार होऊन औषध दुकानांतील कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. औषध पुरवठा सुरळीत राहावा यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. हे करताना त्यांचा कोविड रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांशी थेट संपर्क येताे. यातून या विक्रेत्यांनाही बाधा होण्याचे प्रकार घडले आहेत. २०० पेक्षा जास्त विक्रेते आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेले आहेत, त्यांचे कुटुंबीय बाधित झाले आहेत. तरीदेखील शासन त्यांना कोविड योध्दा म्हणून अग्रक्रम द्यायला तयार नाही. उपचार व कोविड लसीकरणातही प्राधान्य दिले गेले नाही, याची खंत या विक्रेत्यांमध्ये आहे. यासंदर्भात असोसिएशनकडून पत्रव्यवहार देखील केला आहे, पण त्याचीही दखल सरकारने घेतलेली नसल्याने या विक्रेत्यांमध्ये प्रचंड संताप दाटला आहे. तातडीने यावर विचार न झाल्यास इतर व्यवसायांप्रमाणे कडक लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्यात येईल, असाही इशारा कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे व सचिव शिवाजी ढेंगे यांनी दिला आहे.