चालक-वाहकांकडून नियम धाब्यावर
By Admin | Updated: July 18, 2014 00:50 IST2014-07-18T00:49:29+5:302014-07-18T00:50:42+5:30
कोतोली परिसर : गाडी चालविताना मोबाईलवर बोलतात बिनधास्त

चालक-वाहकांकडून नियम धाब्यावर
किरण मस्कर- कोतोली
कितीही नियम शासनाने लावायचे, पण आपणाला जो नियम लावायचा आहे, तोच नियम लावणाऱ्या एस.टी. वाहकांनी एस.टी.चे नियमच धाब्यावर बसविले आहेत.
कोतोली परिसरात वाहक व प्रवासी यांच्यात किरकोळ सुट्टे पैसे देण्यावरून वाद नेहमीच पाहावयास मिळतो. हा वाद काही येथील प्रवाशांना नवीन नाही; पण अशाच वादांमधून सुट्टे पैसे असतानाही प्रवाशांना पैसे न दिल्याने वाहकाला प्रवाशांचा मार खावा लागला.
त्यातच गाडी चालविताना चालक व वाहकांनी मोबाईल बंद ठेवून आपली ड्यूटी करायची आहे, असा नियम अथवा आदेश असतानाही चालक गाडी चालविताना, तर वाहक प्रवाशांना तिकीट देताना मोबाईलवर बोलताना दिसत आहेत. अशा चालक-वाहकांना एक-दोन वेळा समज देणे हा पहिला एस.टी.चा
नियम आहे. त्यानंतर त्यांच्यावर तक्रार दाखल केली जाते किंवा समज देऊनही न ऐकणाऱ्या चालक-वाहकांना निलंबित केले जाते, असा नियम एस.टी.चा आहे; पण अद्याप एकाही चालक-वाहकांवर कारवाई झालेली नाही.
परिसरात एस.टी. चेकरची गाडी अनेकवेळा पाहावयास मिळते; पण कोल्हापूरमधून चेकरची गाडी कोतोलीकडे येणार आहे, ही माहिती वाहकांना अगोदरच समजते.
यामध्ये कोतोली, नांदगावसारख्या बाजारपेठ असणाऱ्या ठिकाणच्या पानटपरी चालक, हॉटेल, किराणा दुकानदाराला फोन लावून ही माहिती उपलब्ध केली जाते. यामध्ये चेकरची निळी गाडी व त्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिले असल्याने चेकरची गाडी ओळखता येते. यामुळे वाहकाला अगोदर नेहमी चहा पिणाऱ्या हॉटेल किंवा नेहमी पान खाणाऱ्या तसेच वारंवार एखाद्या किराणा दुकानात बाजार खरेदी करणाऱ्या दुकानदारांकडून फोनवरून चालक अथवा वाहकाला माहिती दिली जाते. यामुळे पुढे चेकर आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन वाहक आपली गाडी ‘ओके’ करून घेऊन येतात. या चेकरना चालक-वाहक मोबाईलवर बोलताना दिसतात; पण कारवाई काहीच
होत नाही.