शिरोळमध्ये पेयजल योजना वरदायी
By Admin | Updated: November 27, 2014 23:53 IST2014-11-27T23:26:32+5:302014-11-27T23:53:34+5:30
३७ गावांना लाभ : नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर

शिरोळमध्ये पेयजल योजना वरदायी
संदीप बावचे - शिरोळ -प्रदूषणाबाबत भरपूर चर्चा केली जाते; मात्र आजवर ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. कृष्णेसह पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यांना प्रदूषणाची लागण झाली आहे, अशा परिस्थितीत शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचा फायदा शिरोळ तालुक्यातील ३७ गावांना झाला आहे. ५३ गावांपैकी ४९ गावांना सध्या नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. पेयजल योजना बहुतांशी गावांना वरदान ठरली आहे.
शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर व कुरुंदवाड ही दोन नगरपालिका असलेली शहरे व ५३ खेडी आहेत. कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा व वारणा अशा चार नद्या लाभल्यामुळे सुजलाम्- सुफलाम् असा हा तालुका
बनला आहे, असे असले तरी गटार गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीनंतर सर्वच नद्या प्रदूषित बनल्या आहेत. पंचगंगा नदीकाठावरील अकरा, तर कृष्णानदीकाठी असलेल्या २५ गावांना नदीचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध होते. तालुक्यातील अनेक गावांना शुद्धिकरणाशिवाय पाणीपुरवठा होत होता.
गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळात राज्य शासनाकडून अब्दुललाट, आलास, गणेशवाडी, औरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, शिवनाकवाडी, शिरदवाड, लाटवाडी, यड्राव, जांभळी, हरोली, आगर, नांदणी, दत्तवाड, कुटवाड, नृसिंहवाडी, हेरवाड, तेरवाड, कनवाड, अकिवाट, राजापूर, शिरोळ, टाकळीवाडी, शिरटी, उदगांव, चिंचवाड, अर्जुनवाड, घोसरवाड, टाकळी, तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर, संभाजीपूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, हसूर, आदी ३७ गावांत राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाल्यामुळे तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. यातील काही गावामध्ये योजना पूर्ण झाली असून, बहुतांशी योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे.
प्रदूषित पाण्याचा फटका
शिरोळ तालुक्याला चार नद्यांचे वरदान लाभले असले, तरी या नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. बेसुमार वाळू उपसा, तेलाचे तवंग, औद्योगिक वसाहतील सांडपाणी आणि राजापूर धरणातून बॅकवॉटरचे येणारे पंचगंगेचे मिसळलेले पाणी यामुळे बहुतांशी गावांना दूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागते. याचाच फटका तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे.
सर्वांना नदीचेच पाणी
तालुक्यातील ५३ गावांपैकी ४९ गावांना सध्या नदीवरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कूपनलिका व विहिरीतील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर व संभाजीपूर या गावांतील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यालाच नदीचेच पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश कमळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
.चार गावे निविदेच्या प्रतीक्षेत
शिरोळ तालुक्यातील तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर व संभाजीपूर या गावांना राष्ट्रीय पेयजल योजनेचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषद स्तरावरून या कामाच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत. त्यामुळे या योजनेच्या कामास मुहूर्त केव्हा, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. ..