पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात

By Admin | Updated: December 2, 2014 23:17 IST2014-12-02T23:07:39+5:302014-12-02T23:17:23+5:30

शिरढोण, टाकवडेतील योजना : काम अपूर्ण; ग्रामस्थांची गैरसोय

Drinking Water Plans | पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात

पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात

गणपती कोळी - कुरुंदवाड --शिरढोण व टाकवडे गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दोन्ही गावांच्या नेत्यांनी राजकीय वजन वापरून राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून कामालाही सुरुवात झाली. काम अर्ध्यावर येताच योजनेत कारभाऱ्यांनी इतरांना विश्वासात न घेणे, एकतंत्री कारभार, ठेकेदारांच्या चुका, काहींची दुखावलेली मने यातून निर्माण झालेल्या आंदोलनामुळे दोन्ही गावांच्या योजना रखडल्या आहेत.
सत्ताधारी व विरोधकांच्या जुगलबंदीत ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांचा घसा मात्र पाण्याविना कोरडा राहण्याची शक्यता आहे.
दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील शिरढोण व टाकवडे गावाला बसतो. टाकवडेसाठी इचलकरंजी नगरपालिकेकडून पिण्यासाठी फिल्टर झालेले पाणी दिले जाते. मात्र, वाढलेली लोकसंख्या, योजनेला असलेली गळती, अपुरा व अनियमित होत असलेला पाणीपुरवठा यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामपंचायतीने पाण्यासाठी कुरुंदवाड येथील कृष्णा नदीतून राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. या योजनेसाठी चार कोटी १६ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर होऊन काम चालू झाले आहे.
शिरढोण ग्रामस्थांना पंचगंगेतून पाणीपुरवठा होत असल्यामुळे या दूषित पाण्यापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी या गावानेही स्वतंत्ररीत्या कुरुंदवाड कृष्णा नदीतून चार कोटी ९५ लाख रुपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून घेतली. दोन्ही गावांच्या स्वतंत्र योजना असल्या, तरी ठेकेदार मात्र एकटाच आहे.
योजनेतील त्रुटी, कारभाऱ्यांनी इतरांना विश्वासात न घेतल्यामुळे दुखावलेली मने, ठेकेदारांच्या चुका यातून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही योजना स्वतंत्र असताना ठेकेदारांनी एकाच चरीतून दोन्ही गावांच्या जलवाहिन्या घातल्या आहेत. ते चुकीचे आहे.
यावरून शिरढोणचे माजी सरपंच रमेश ढाले व मधुकर सासणे यांनी उपोषणाचे शस्त्र घेऊन योजना स्वतंत्र केल्याशिवाय काम चालू न करण्याचा इशारा ठेकेदारांना दिला आहे. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून योजनेचे काम बंद पडले आहे. तर टाकवडेचे माजी सरपंच सुजाउद्दीन मुल्ला, सदाशिव पाटील यांनीही निकृष्ठ दर्जाचे काम निविदेप्रमाणे होत नसल्याचा आरोप करून काम बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला .

Web Title: Drinking Water Plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.