म्हाकवेतील ‘पेयजल’चे काम निकृष्ट
By Admin | Updated: July 9, 2015 00:25 IST2015-07-09T00:25:52+5:302015-07-09T00:25:52+5:30
शिवसेनेचा आरोप : अशुद्ध पाणीपुरवठा चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशारा

म्हाकवेतील ‘पेयजल’चे काम निकृष्ट
म्हाकवे : म्हाकवे (ता. कागल) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून नदीमध्ये स्टेच गॅलरी, नदीपासून पाईपलाईन, पाणी साठविण्यासाठी सुमारे ४० हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे काम गतवर्षी पूर्ण झाले आहे. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्ची पडले आहेत. मात्र, तरीही गावाला गाळ मिश्रित अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा होत असून, या योजनेचे काम निकृष्ट झाल्यामुळेच ग्रामस्थांना त्रास होत असल्याची तक्रार येथील शिवसेना शाखेच्यावतीने गटविकास अधिकाऱ्याकडे केली
आहे.
या कामाची त्वरित चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सुमारे सात हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या गावासाठी २०११-१२ मध्ये पेयजलमधून दीड कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली, तर महाजलमधून जॅकवेलसाठी सुमारे दहा लाखांचा निधीही मिळाला आहे. यातून जॅकवेलसह नदीमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी स्टेच गॅलरी, सहा इंची पाईपलाईन, पाणी साठविण्यासाठी टाकी, आदी कामे झाली आहेत.
मात्र, ही सर्वच कामे दर्जाहीन व नियोजितपणे झालेली नाहीत.
त्यामुळे ग्रामस्थांना सध्या गाळ मिश्रित व अशुद्ध पाणीपुरवठा होत
आहे. याबाबत वारंवार तक्रारी
करूनही वरिष्ठांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने आता आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्याचे ठरविले आहे.
निवेदनावर शाखा अध्यक्ष निवृत्ती पाटील, उपाध्यक्ष धोंडिराम पाटील, केरबा पाटील, युवराज पाटील,
संजय देवडकर, सिद्राम शिंदे, आनंदा पाटील, सिद्राम पाटील, आदींची नावे आहेत. (वार्ताहर)
तक्रार होताच जांभुळवाडी, भाटनांगनूर तर्फ सावंतवाडी येथील पाणी योजनेची चौकशी झाली. मात्र, म्हाकवे येथील पाणी योजनेच्या कामाबाबत शिवसेनेसह अनेक ग्रामस्थांनी तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, या कामाची चौकशीच झालेली नाही, याचे गौडबंगाल काय? येथील ठेकेदार आणि स्थानिक अधिकारी यांच्यामध्ये मिलीभगत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावे.
- निवृत्ती पाटील, शिवसेना, शाखा अध्यक्ष, म्हाकवे.