थेट गटारीत सोडले पिण्याचे पाणी

By Admin | Updated: December 9, 2014 00:32 IST2014-12-09T00:11:29+5:302014-12-09T00:32:27+5:30

महापालिकेचा ‘उद्योग’ : गळती न काढताच शॉर्टकटचा पर्याय; लाखो लिटर पाणी जाते वाया

Drinking water left in direct drainage | थेट गटारीत सोडले पिण्याचे पाणी

थेट गटारीत सोडले पिण्याचे पाणी

गणेश शिंदे - कोल्हापूर -महिन्यातून एकदा जलवाहिनीला लागणारी गळती... पाणी उपसा केंद्राची नादुरुस्ती... त्यातच शहरात वर्षानुवर्षे असलेल्या जुन्या व आयुर्मान संपलेल्या जलवाहिन्या.. रस्ते तयार करताना बदलण्यात न आलेल्या अंतर्गत वाहिन्या यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था खिळखिळी झाली आहे. काही ठिकाणी गळती न काढता हजारो लिटर पिण्याचे पाणी चक्क गटारीत वाया जाते आहे. परिणामी महापालिकेला आर्थिक नुकसान सोसावे लागते, त्याच प्रमाणे पाणीटंचाईचा सामनादेखील करावा लागतो.
शहरातील फुलेवाडी रिंगरोड, सायबर कॉलेज परिसर, कसबा बावडा आदी परिसरामध्ये जलवाहिनीची गळती काढण्याऐवजी ते पाणी लहान पाईपमधून वळवून गटारींमध्ये सोडले जात असल्याचे वास्तव आहे. आज, सोमवारी दिवसभर ‘लोकमत’चे प्रतिनिधी व छायाचित्रकारांनी शहरात विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष या पाणी नासाडी आणि वस्तुस्थितीची माहिती घेतली.
शहरातील नागरिकांना सध्या शिंगणापूर योजनेमधून पाणी मिळते, पण ही योजना अस्तित्वात येऊन २० ते २५ वर्षे झाली आहेत. त्यातच आता शहराचा विस्तार वाढला आहे, तसेच उपनगरांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे रोज कोणत्या - कोणत्या उपनगरांत पाण्याची टंचाई जाणवते. शहराभोवती मुबलक पाणी असूनसुद्धा अशा प्रकारच्या गळत्यांमुळे पाणी टंचाई जाणवते. आठ नगरसेवकांच्या प्रभागामागे जलवाहिनी दुरुस्तीसाठी एक फिटर अशी व्यवस्था आहे. सध्या महापालिकेकडे सुमारे १० फिटर आहेत. पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाकडे फिटरची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे, पण प्रशासनाने संख्या वाढवलेली नाही. अशातच क्रांतिसिंह नाना पाटील नगर, बोंद्रेनगर, सानेगुरुजी वसाहत आदी उपनगरांमध्ये तसेच तपोवन मैदानाजवळील एका शाळेजवळ
रात्री १२ नंतर पाणी वाहताना दिसते. त्यावर मात्र स्थानिक नगरसेवक सभागृहात आवाज उठविताना दिसत नाही.


फुलेवाडी रिंगरोडवरून बोंद्रेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अयोध्या कॉलनीकडे जाणाऱ्या चौकामध्ये एका लहानशा पाईपमधून हे पाणी सोडण्यात आले आहे; पण नागरिकसुद्धा वाहत जाणाऱ्या पाण्याकडे बघत डोळेझाक करतात. अशा प्रकारे होणाऱ्या पाण्याच्या नासाडीची ना प्रशासनाला फिकीर, ना नागरिकांना, असे म्हणण्याची वेळ आली आहे.


सायबर चौकाकडून काटकर पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका बाजूला काढण्यात आलेल्या मोठ्या जलवाहिनीमधून रोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाण्याचा लोंढा वाहत असतो. त्याचा उपयोग परिसरातील नागरिक भांडी व कपडे धुण्यासाठी करतात. रोज सुमारे हजारो लिटर पाणी या ठिकाणाहून वाया जात आहे.

काळम्मावाडी थेट पाईपलाईनची प्रतीक्षा...
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे ४८८ कोटी रुपयांचे इस्टिमेट आहे. राज्य शासन व महापालिका प्रत्येकी दहा टक्के रक्कम, तर ८० टक्के रक्कम केंद्र सरकार देणार आहे. सध्या योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेचे डिझाईन करण्याचे काम सध्या सुरू आहे. या रकमेपैकी ५० टक्के रक्कम सुमारे १९१ कोटी रुपये महापालिकेस मिळाले आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शहरातील जलवाहिन्या या जुन्या झाल्या आहेत. जलवाहिन्यांची गळती काढणारी यंत्रणा वाढवणे आवश्यक आहे, तरच हा गळतीचा प्रश्न सुटेल.
- मनीष पवार, जलअभियंता,
कोल्हापूर महापालिका.

Web Title: Drinking water left in direct drainage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.