बस्तवाडमधील पिण्याचे पाणी दूषितच
By Admin | Updated: November 7, 2014 23:51 IST2014-11-07T23:46:44+5:302014-11-07T23:51:01+5:30
प्रयोगशाळेने दिला अहवाल : स्वच्छ पाणी पुरविणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी : अधिकाऱ्यांची उत्तरे

बस्तवाडमधील पिण्याचे पाणी दूषितच
कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील बस्तवाड येथे कृष्णा नदीतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल अणुुजैविक तज्ज्ञ उपविभागीय प्रयोगशाळेने दिला आहे. मात्र, गावासाठी पुरविण्यात येणारा स्वच्छ पाण्याचा पुरवठा हा ग्रामपंचायतीनेच करायचा आहे, अशी बेजबाबदार उत्तरे विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून येथील ग्रामस्थांना दिली जात आहेत. एकूणच शासनाच्या प्रतिनिधींकडून दूषित पाणीप्रश्नी हात झटकले जात असल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बस्तवाड (ता. शिरोळ) गावाला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा होत आहे. गेले चार दिवस गावाला मळी मिश्रित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अजूनही कुरुंदवाड नगरपरिषद, श्री गुरुदत्त शुगर्स, टाकळीवाडी, श्री दत्त कारखाना शिरोळ यांच्यावतीने टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सामाजिक आरोग्य सेवेच्या अणुुजैविक तज्ज्ञ उपविभागीय प्रयोगशाळेत कृष्णा नदीतील बस्तवाड पाणवठ्याजवळील पाण्याची तपासणी केली असता, पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल ग्रामपंचायतीला मिळाला असल्याची माहिती ग्रामसेवक आर. आय. कोळी यांनी सांगितली.
गावात साथीचा एकही रुग्ण आढळला नसून, टाकळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी एम. ए. ऐनापुरे, आरोग्य सहायक अमोल कोळी, प्रकाश बुरुटे, धनंजय मस्के, एस. बी. सिद्ध, विमल जंगम यांचे पथक गावात तळ ठोकून आहे. आज, शुक्रवारी शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, इकबाल बैरागदार, पंचायत समिती सभापती शीला पाटील यांनी भेट दिली. (वार्ताहर)
दोघा अभियंत्यांची सामाजिक बांधीलकी
बस्तवाड गावाला थेट नदीतून पाणीपुरवठा होत असल्याने गावाला वारंवार अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने, येथील पुणे येथे अभियंता असलेले सुनील बाळासो कोळी व संदीप आण्णासो जंगम या दोन युवकांनी गावासाठी आठ लाखांची फिल्टर पाणीपुरवठा योजना स्वखर्चाने बांधून देणार असल्याचे सांगितले आहे.