‘सीपीआर’वर मलमपट्टी!-- ‘लोकमत’ करणार या प्रश्नांचा पाठपुरावा

By Admin | Updated: August 1, 2014 23:22 IST2014-08-01T22:26:29+5:302014-08-01T23:22:49+5:30

कांही प्रश्न लागले मार्गी : धोरणात्मक प्रश्नांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा वाढवविण्याची गरज

Dressing on CPR! - Follow the question of 'Lokmat' | ‘सीपीआर’वर मलमपट्टी!-- ‘लोकमत’ करणार या प्रश्नांचा पाठपुरावा

‘सीपीआर’वर मलमपट्टी!-- ‘लोकमत’ करणार या प्रश्नांचा पाठपुरावा

आप्पासाहेब पाटील / गणेश शिंदे - कोल्हापूर
कोल्हापूरसह सीमेलगतच्या सांगली. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, या जिल्ह्यांतील गरिबांचा आधारवड असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील समस्या ( सीपीआर), कुमकूवत प्रशासन, शासनदरबारी प्रलंबीत असलेले प्रश्न ‘लोकमत’ने ‘आता बस्स’ या आपल्या वृत्तमालिकेतून जानेवारी महिन्यांत मांडले. गेल्या सहा महिन्यात यातील कांही प्रश्न मार्गी लागले असून अजूनही अनेक समस्या ‘जैसे थे’ आहेत. सीपीआर बचाव कृती समितीच्या माध्यमातूनही आता दबावगट तयार झाला असून सीपीआरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनीच जोर लावणे गरजेचे आहे.

ट्रामा केअर युनिटचे काम सुरु
केंद्र सरकारकडून ट्रामा केअर युनिट मंजूर होऊन त्याचे काम सुरू आहे. यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे. पुण्यानंतर कोल्हापूरसाठी हे युनिट मंजूर आहे. केंद्र सरकारकडून ५ कोटी २२ लाख मिळाले आहेत. त्यातील ५ कोटी यंत्रसामग्रीसाठी व २२ लाख हे अन्य संबंधीत सेवेसाठी वापरावेत असे सांगितले गेले होते. मात्र, या युनिटसाठी लागणारा वर्ग १ ते वर्ग ४ असा एकूण ११७ पदांची भरती राज्य शासनाने करावयाची होती. याबाबत पाठपुरावा सुरु असून ट्रामा केअर युनिटचे पुढील भवितव्य आता राज्य शासनावर अवलंबून आहे.
लिफ्टसाठी आऊटसोर्सीगने कर्मचारी
सीपीआरमध्ये एकूण तीन लिफ्ट आहेत. मात्र, तिनही लिफ्ट गेल्या दोन ते अडिच वर्षांपासून केवळ चालवण्यासाठी कर्मचारी नसल्याने बंद स्थितीत आहेत. एका बाळंतिणीचा लिफ्टमध्ये मृत्यू झाल्यानंतर लिफ्ट बंद करण्यात आल्या होत्या. त्या दुर्दवी घटनेनंतर लिफ्टसाठी लिफ्टमनच नाही. आताच्या स्थितीला तिनही लिफ्ट सुरु करायच्या म्हटल्यास बारा कर्मचारी लागतात. उपलब्ध कर्मचाऱ्यांमधून त्यासाठी कर्मचारी देणे शक्य नसल्याचे सांगितले जाते. मात्र, लवकरच आऊटसोर्सिंगने लिफ्ट चालू करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे.

१७ कोटींचे स्वतंत्र बर्न युनिट होणार
बर्न वॉर्डमध्ये पुरूष व महिला असे दोन विभाग आहेत. मात्र, पत्र्याचे शेड असल्यामुळे महिला रूग्णांना जीवघेणा त्रास होतो. वॉर्डमधील पत्रा मात्र अजून बदलेला नाही. या वॉर्डात प्रशासनाने काही सुधारणा केल्या आहेत, पण त्या अजूनही पुरेशा नाहीत. हे मुद्दे गंभीरपणे मांडला गेले होते. त्याची दखल प्रशासकीय स्तरावर घेतली गेली. सीपीआर प्रशासनाने आता १७ कोटींचा बर्न वॉर्ड स्वतंत्रपणे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून त्यासाठी केंद्र सरकारची मदत घेण्याबाबत सुचवले आहे.

प्रसूती विभागातील वेदना कधी कमी होणार...
---सीपीआरमधील प्रसूती विभाग म्हणजे गरोदर महिलांना प्रसूतीच्या वेदनांपेक्षा भयानक वेदना देणारा आहे. येथील परिस्थिती कधी बदलणार की नाही, असा प्रश्न त्या ठिकाणी गेल्यास उपस्थित होतो.
या विभागात अपुरी कर्मचारी संख्या असल्याने रूग्णांना म्हणावी तितकी चांगली सेवा मिळत नसल्याचे जाणवते. चतुर्थश्रेणीतील पाच व परिचारिका १६ असे एकूण २१ कर्मचाऱ्यांवर इतक्या मोठ्या विभागाचा डोलारा आहे.
जन्मलेल्या बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या वॉर्मर व
व्हेटिलेटरची संख्या या ठिकाणी अपुरी आहे. ती काही वाढवायला प्रशासन तयार नाही.
प्रसूतीसाठी जिल्हाभरातून महिला या ठिकाणी येतात. ही संख्या मोठी आहे. त्या मानाने येथे बेडची संख्या अगदीच अल्प आहे. मागणी असूनही बेडची संख्या अजून वाढवलेली नाही. ही संख्या वाढणे गरजेचे आहे.
येथील स्वच्छता म्हणजे गलिच्छपणाचा कळस म्हणावा लागेल अशी स्थिती आहे. केवळ चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांअभावी ही स्थिती दिसते. पण त्यामध्ये सुधारणा होत नाही. प्रशासनाकडून गर्भवतींना व त्यांच्या नातेवाईकांना अंघोळीसाठी पाणी मिळत नाही. मात्र, सीपीआर प्रशासनाकडून याकडे गांभिर्यांने कधीच पाहत नाही.
नव्या सीटी स्कॅनचा प्रस्ताव प्रलंबीत
--सीपीआरमधील सीटी स्कॅन विभाग बंदच आहे. आताच्या स्थितीला रूग्णांना बाहेरून महागडे शुल्क मोजून सीटी स्कॅन करावे लागत आहे. हा खर्च साडेतीन हजारापर्यंत जातो.
--येथील सध्याचे मशिन हे १२ वर्षे जुने आहे. ते दुरूस्त होऊ शकत नसल्याने नव्या मशिनचा प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला आहे. नव्या सीटी स्कॅनसाठी साडेसहा कोटींचा निधी हवा आहे.
--सीपीआर प्रशासन त्याचा पाठपुरावा करीत आहे. नवीन सीटीस्कॅन मशिन येथे आल्यास रूग्णांना स्कॅनिंगसाठी नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे.

हृदयशस्त्रक्रिया विभागासाठी
६९ पदे मंजूर
सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभाग अद्ययावत करण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी हार्ट सर्जन, कार्डियालॉजिस्ट व संबंधीत तंत्रज्ञांपासून ते वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती. राज्य शासनाने या विभागासाठी ६९ पदे मंजूर केली आहेत. आता यासाठी लागणाऱ्या निधीची येणाऱ्या बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
धर्मशाळेचा प्रश्न मार्गी लागणार
सध्या हृदयशस्त्रक्रिया विभागसमोर, अधिष्ठाता कार्यालयाजवळ व औषध विभागाजवळ अशा तीन धर्मशाळा आहेत. याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रशासनाने कोणतीच सुविधा दिलेली नाही. आता राजर्षी शाहू मेडिकल कॉलेजचे काम शेंडा पार्क येथे सुरु आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. सीपीआरमधील काही विभाग त्या ठिकाणी लवकरच हलवले जाणार आहेत. ते त्या ठिकाणी गेल्यास उपलब्ध होणाऱ्या जागेत रूग्णांच्या नातेवाईकांसाठी चांगली धर्मशाळा केली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांचे आऊटसोर्सिंग
सीपीआरकडे वर्ग चारची एकूण ३१८ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ७५ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्यास मंजुरी मिळत नाही. सध्या राज्या शासनाचे धोरण हे ‘वर्ग-४’च्या पदांसाठी असणारे काम आऊटसोर्सिंगने करण्याबाबतचे आहे. सध्या तशी भरती सुरु केली जात आहे.
नवीन दोन एक्स-रे मशिन
एक्स-रे मशिन ही दहा ते बारा वर्षे जुनी आहेत. ही जुनी असलेली मशिन बदलली जाणार आहेत. त्याचा प्रस्ताव होता. हा प्रश्न मार्गी लागला असून आताच्या स्थितीला दोन नवीन एक्स-रे मशिन दाखल करण्यात आली आहेत.
व्हेन्टिलेटरची संख्या वाढवली
व्हेन्टिलेटर, डिफेब्रिलेटर, व मल्टि पॅरा मॉनिटर सारखी महत्वाची उपकरणे अतिशय जुनी झाली होती. हृदय शस्त्रक्रिया व आयसीयु विभागात त्याचा जास्त वापर होत असल्याने नवीन उपकरणाचे प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी बरीचश्ी नवीन उपकरणे दाखल झाली आहेत..
शीतगृह सुरू
शवविच्छेदन विभागातील शीतगृह सुमारे दिड महिने बंद होते. ते आता सुरु करण्यात आले आहे. शीतगृहातील बेडची संख्या सहा आहे. भविष्यात शीतगृहाची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

स्वतंत्र सर्पदंश विभागाची गरज...
सर्प दंश झालेल्या रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची गरज आहे. मात्र, तो पूर्वीपासून सर्जरी व मेडिसीन विभागाकडे आहे. स्वतंत्र वॉर्डची गरज नाही, असे सीपीआर प्रशासन सांगते. या विभागात सर्पदंश प्रतिबंधक असलेल्या लसीचा नेहमी तुटवडा असतो व रूग्णांच्या नातेवाईकांना बऱ्याचवेळा ही लस बाहेरून आणण्यास सांगितले जाते. मात्र, आता परिस्थितीत सुधारणा झाली आहे. पुण्याच्या हाफकिन संस्थेकडून सर्पदंश लस वेळेवर उपलब्ध होत आहे. रोज सुमारे पाच ते सहा सर्पदंश रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. रुग्णांना लस दिली जात आहे. सध्या या लसी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते.
एमआरआय, ट्रामा केअर युनिट मार्गी लावणार : डॉ. कोठुळे
सीपीआरमध्ये सर्वसामान्य व गरीब रूग्ण येत असतो. डॉक्टर, कर्मचारी व रूग्णांचे संबंध हे गैरसमजातून बिगडत आहेत. आपण डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रूग्ण व नातेवाईकांशी सौदार्हपूर्ण वागण्याच्या सुचना केल्या आहेत. सीपीआरमधील विकास व तेथील सेवा जास्तीत जास्त गतीमान करण्याचा आपला प्रयत्न आहे. सीपीआरमध्ये एमआरआय युनिट स्थापण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा राज्य शासनास द्यावयाच्या प्रस्तावाचे काम सुरु आहे. एमआरआय आल्यास रूग्णाचे बरेचसे पैसे वाचणार आहेत. ट्रामा केअर युनिट उभारण्याचे काम सुरू आहे. ते पूर्णपणे लवकरच अस्तित्वात आणण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. दशरथ कोठुळे,
अधीष्ठाता,

Web Title: Dressing on CPR! - Follow the question of 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.