कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई व वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तोकडे कपडे घालून येण्यास मनाई केली आहे. महिला मुलींना अंगप्रदर्शन होईल असे शॉर्ट स्कर्ट, पाश्चिमात्य कपडे, तसेच पुरुषांनादेखील बर्म्युडा, थ्री फोर्थ असे कपडे घालून या दोन्ही मंदिरांमध्ये दर्शनासाठी येता येणार नाही.महिला व पुरुष भाविकांनी सामाजिक भान राखून पारंपरिक, अंगभर पेहराव असलेले कपडे परिधान करावेत, असे आवाहन समितीने केले आहे. समितीचा ८ मे रोजी केलेला नियम पत्र व्हायरल होताच चर्चेत आला. जिल्हाधिकारी या समितीचे सध्या प्रशासक आहेत.श्री अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांतील एक पूर्ण पीठ असून, मंदिराचे माहात्म्य मोठे आहे. त्यामुळे येथे भाविकांनी दर्शनासाठी येताना सामाजिक भान व धार्मिक पावित्र्य राखून भारतीय संस्कृतीचे पारंपरिक कपडे परिधान करणे आवश्यक आहे.
..अखेर ड्रेसकोडच्या अंमलबजावणीला मुहूर्त लागला त्यासाठी २०१७ मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ड्रेस कोड लागू केला होता. मात्र, त्यावेळी काही प्रमाणात विरोध झाल्याने या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा देवस्थान समितीने हा निर्णय घेतला; पण नियम लागू केला नाही. अखेर या ड्रेस कोडच्या अंमलबजावणीला मुहूर्त लागला आहे.
भाविकांनी अंबाबाई तसेच जोतिबा मंदिरात दर्शनासाठी किंवा धार्मिक विधीसाठी येताना ताेकडे कपडे न घालता पारंपरिक पद्धतीचे तसेच अंगप्रदर्शन होणार नाही, असे कपडे परिधान करावेत व सूचनेचे पालन करावे. - शिवराज नाईकवाडे सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती