‘मराठा स्वराज्य भवन’चे स्वप्न दोन वर्षांत साकारणार

By Admin | Updated: February 7, 2015 01:04 IST2015-02-07T01:03:38+5:302015-02-07T01:04:43+5:30

मदतीचे हात पुढे : आतापर्यंत १५ लाखांचा निधी जमा; दानशूरांनी पुढे येण्याची गरज

The dream of 'Maratha Swarajya Bhavan' will come true in two years | ‘मराठा स्वराज्य भवन’चे स्वप्न दोन वर्षांत साकारणार

‘मराठा स्वराज्य भवन’चे स्वप्न दोन वर्षांत साकारणार

प्रवीण देसाई - कोल्हापूर राजर्षी शाहूंच्या नगरीत सर्व समाजाचे सांस्कृतिक हॉल तसेच भवन आहेत. त्याला अपवाद मराठा समाजाचा आहे. या समाजाचे भवनच कोल्हापुरात नाही. ते होण्यासाठी मराठा महासंघाच्या पुढाकाराने ‘मराठा स्वराज्य भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत. दोन वर्षांत ते उभे करण्याचा चंगच कार्यकर्त्यांनी बांधला असून यासाठी मराठा समाजासह इतर समाजातूनही मदतीचा ओघ येत आहे.मराठा समाजबांधव एकत्र यावेत असे हक्काचे ठिकाण व्हावे, हे प्रत्येक मराठा बांधवाला वाटते. बहुतांश राज्यकर्ते हे मराठा समाजाचेच आहेत. परंतु आजतागायत मराठा समाजाचे स्वतंत्र भवन उभे राहू शकले नाही हे विशेष, परंतु बिगर राजकीय व मराठा समाजासाठी कार्य करणारी संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाने समाजाचे भवन व्हावे, या विचारांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याची सुरुवात म्हणून २०१२मध्ये जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या पुढाकाराने ‘मराठा स्वराज्य भवन’ या संस्थेची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर मराठा समाजासाठी भवनाची असलेली गरज याबाबत जनजागृतीही सुरू झाली. त्याला कमी अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळाला, परंतु याला खऱ्या अर्थाने मूर्तरूप आले ते आॅगस्ट २०१४ मध्ये घेतलेल्या मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात. यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाच्या माध्यमातून सर्व ते सहकार्य करण्याचे जाहीर केले होते. त्याच दिवशी उपस्थित मान्यवरांनी मदतीची घोषणा केली होती. ही रक्कम जवळपास ४० लाख रुपयांची होती. त्यातील १५ लाख रुपये मदत आतापर्यंत जमा झाली आहे. त्यामध्ये मराठा समाजातील राजकीय नेते, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्य मराठाबांधवांचा समावेश आहे. ही मदत ११ हजारांपासून १ लाखांपर्यंतची आहे. याशिवाय इतर समाजानेही मदतीचा हात पुढे केला आहे. समाजामध्ये प्रबोधनासाठी जवळपास दीडशेहून अधिक रिक्षांवर याचे फलक लावण्यात आले आहेत. मदतीचा ओघ सुरू असला तरी अजूनही समाजातील सर्व स्तरांतील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची गरज आहे.
या भवनसाठी ५ एकर जागेची गरज असून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. काही जागाही सुचविण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडूक सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गत सरकारकडून घोषणा झाली परंतु ते परत सत्तेवर न आल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते परंतु नव्या सरकारकडून त्याची पूर्तता होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे.

कसे असेल
मराठा स्वराज्य भवन
या भवनासाठी ५ एकर जागा अपेक्षित आहे. ही वास्तू फक्त विवाह समारंभापुरती मर्यादित राहणार नाही तर या ठिकाणी अभ्यासिका, वसतिगृह, कुस्तीचा आखाडा, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर अकॅडमी, महिलांसाठी ‘विशेष कक्ष’ स्थापन केला जाणार आहे. येथे त्यांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जागेसाठी शासनपातळीवर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे. निश्चितच याला यश येईल व दोन वर्षांत मराठा समाजाचे स्वप्न असलेली ही वास्तू साकारेल.
- वसंतराव मुळीक,
जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ

Web Title: The dream of 'Maratha Swarajya Bhavan' will come true in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.