कल्पनेच्या शिंपल्यातून उमटले स्वप्नमोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2017 01:08 IST2017-02-14T01:08:30+5:302017-02-14T01:08:30+5:30

संगीत व नाट्यशास्त्र विभागात सकाळी रांगोळी स्पर्धेने झाली. पारंपरिक रांगोळी या विषय स्पर्धकांना होता.

Dream interpretation comes from Swampamoli | कल्पनेच्या शिंपल्यातून उमटले स्वप्नमोती

कल्पनेच्या शिंपल्यातून उमटले स्वप्नमोती

कोल्हापूर : ‘कल्पनेच्या शिंपल्यातून, ठेविले जे स्वप्नमोती; उमलूनी सौंदर्य त्यातून, बहरली तवरूप ज्योती; स्वप्न अन् सौंदर्य जणू, साकार तव देहात आहे.’ या उक्तीची प्रचिती सोमवारी शिवाजी विद्यापीठात आयोजित ३२ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय ‘शिवोत्सव’ युवा महोत्सवातून आली. महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवातच रांगोळी, लघुनाटिका, चित्रकला, शास्त्रीय नृत्य स्पर्धेने झाली.
संगीत व नाट्यशास्त्र विभागात सकाळी रांगोळी स्पर्धेने झाली. पारंपरिक रांगोळी या विषय स्पर्धकांना देण्यात आला होता. राजस्थान, गुजरात, बिहार, चंदीगड, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून हुबेहूब दर्शविले. त्याची छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्ये उतरविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती.
स्पर्धेत नागपूर, केरळ, तिरूपती, मुंबई, वनस्थळी, पटियाळा, मणिपूर, आसाम, छत्तीसगढ, हरियाणा, भोपाळ, पंजाब, पुणे, वाराणसी येथील विद्यापीठातील स्पर्धकांनी शास्त्रीय नृत्याच्या विविध कलाप्रकारांचे शास्त्रोक्त सादरीकरण करून रसिकांची मने जिंकून घेतली. भरतनाट्यम, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, मणिपुरी, कथ्थक, कथ्थकली, आदी शास्त्रीय नृत्यप्रकारांचे या विविध प्रांतातील विद्यार्थ्यांनी मनोहारी दर्शन घडविले.
भाषा भवन येथील वि. स. खांडेकर सभागृहात लघुनाटिका हा कला प्रकाराला पहिल्या सत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामध्ये मध्यप्रदेश येथील डॉ. हरिसिंह गौर विश्वविद्यालय सागर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘अंतिम इच्छा’ नावाची लघुनाटिका सादर केली. या नाटिकेमधून कल्पना विश्वाच्या माध्यमातून युद्धानंतर स्वर्गलोकामध्ये भारतीय सैनिक व पाकिस्तानी सैनिक पोहोचतात त्यांच्यामधील संवाद माध्यमातून त्यांनी वास्तवाचे दर्शन घडविले. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘कब होगी सुबह’ या लघुनाटिकेच्या माध्यमातून युवक- युवतींनी राष्ट्रीय एकात्मता, सुराज्यकरण, नोटाबंदी, भ्रष्टाचारचे दर्शन उपस्थितांना दाखविले तर केरळ येथील श्री शंकराचार्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्टेजवर हुबेहूब फळांचे मार्केट उभे करून लॉटरी तिकीट माध्यमातून माणुसकीचे दर्शन उपस्थितांना दाखविले.
विद्यार्थ्यांनी आपल्या लघुनाट्यांना उत्तम वेशभूषा व पूरक नेपथ्याची जोड देत त्यांच्या एकूणच प्रगल्भ सामाजिक व राजकीय जाणिवेचे दर्शन उपस्थितांना घडविले. हसत-हसवत, कधी एखाद्या व्यंगावर थेट बोट ठेवत तर कधी तिरकस कोपरखळ्या मारत आपला संदेश लोकांच्या गळी उतरविण्याचे विद्यार्थ्यांचे कौशल्य या स्पर्धेतून प्रत्ययास आले. बहाने, व्हेजिटेबल, कब होगी सुबह, दो जासूस, हम नहीं सुधरेंगे, इन्सान ही इन्सान को मारता है, स्वर्ग-नरक आदी लघुनाट्यांतून नोटा बंदी, संविधानाचे महत्त्व, पैसा व प्रेम यांतील संघर्ष, लोकशाहीचे महत्त्व आदींसह ताज्या सामाजिक-राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
मानव्य विद्या सभागृहात आज सकाळी स्पॉट पेंटिंग व स्पॉट फोटोग्राफीची स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही स्पर्धांत प्रत्येकी पंधरा स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पॉट पेंटिंग स्पर्धेसाठी ‘आपल्या आसपासचे सर्वसाधारण जीवन’ असा विषय देण्यात आला होता. या कलाप्रकारामध्ये दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकणारे चित्र असा विषय देण्यात आला होता. या प्रकारामध्ये १५ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये नदीवर म्हशी धुणारा शेतकरी, नदीची पूजा करणारी युवती, चहाटपरीवरील गप्पा, ग्रामीण भागातील सकाळची दिनचर्या, योगा क्लास अशा विविध ठिकाणची दिनचर्या युवकांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून कागदावर साकारल्या. सकाळी हे अनोख्या कलाकृती पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी विद्यापीठात मोठी गर्दी केली होती.
स्पॉट फोटोग्राफीसाठी १९ विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता. स्पॉट फोटोग्राफीसाठी झाडांची रचना हा विषय देण्यात आला होता. यावेळी विद्यापीठ परिसरात प्रत्येक विद्यार्थी विविध प्रकारातील (अँगल) मधील छायाचित्रे काढत होते.
इतरांपेक्षा आपला फोटो कसा सरस ठरविण्यासाठी प्रत्येक जण धडपत होता. त्यांची फोटोग्राफी आवड पाहून अन्य विद्यार्थ्यांनासुद्धा फोटोग्राफीबाबत कुतूहल निर्माण झाले होते.
संगीत विभाग पाठीमागील तलाव, भाषा भवनमागील तलाव, गेस्ट हाऊस पाठीमागील झाडी, जुन्या कारंजा परिसरात फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होती.


महोत्सवात मला पहिल्यांदाच भारतीय संस्कृतीचे दर्शन झाले. अनेक राज्यांतील मुला-मुलींशी चांगली मैत्री झाल्याने नवीन सवंगड्यांच्या सोबतीसह नवीन संस्कृती पाहायला मिळाली.
- प्राची दुबे, दीनदयाल उपाध्याय, गोरखपूर युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश

महोत्सवात मला नवी ऊर्जा मिळाली तसेच एक नवी प्रेरणा घेऊन मी येथून परत जात आहे. येथील आठवणी माझ्यासोबत आयुष्यभर राहतील.
- आनंद विश्वनाथ, कालीकत युनिव्हर्सिटी, केरळ

Web Title: Dream interpretation comes from Swampamoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.