शिरोळ तालुक्याचा कायापालट हेच स्वप्न

By Admin | Updated: November 21, 2014 00:28 IST2014-11-20T20:55:50+5:302014-11-21T00:28:32+5:30

क्षारपड जमीन सुपीक बनविणार : तालुका निर्मलग्रामसाठी प्रयत्नशील; स्पर्धा परीक्षा केंद्रांना मदत करणार -- माझा अजेंडा...!--आमदार उल्हास पाटील

Dream of change of Shirol taluka | शिरोळ तालुक्याचा कायापालट हेच स्वप्न

शिरोळ तालुक्याचा कायापालट हेच स्वप्न

संदीप बावचे - शिरोळ --कृष्णा, पंचगंगा, वारणा व दूधगंगा या चार नद्यांच्या कुशीत वसलेल्या शिरोळ तालुक्याचा कायापालट करणार आहे. तालुका समृद्ध झाला पाहिजे ही माझी जिद्द आहे, अशी कणखर भूमिका आमदार उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. -शिरोळमध्ये मी यापूर्वी विविध क्षेत्रांतून काम केले आहे. ऊसदर प्रश्न आंदोलन, दूध दरप्रश्नी आंदोलन यात सहभागी होऊन काम केले आहे. मात्र, फक्त आंदोलने करून सर्वच प्रश्न सुटत नाहीत, प्रश्न अनेक आहेत. तालुक्यात क्षारपड जमिनीचा मोठा प्रश्न आहे. हजारो एकर जमीन क्षारपड बनली आहे. विविध शासकीय योजना, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत व शेतकऱ्यांत जनजागृती करून जमीन सुपीक बनविण्याचा माझा मानस आहे.
शेतकरी संघटनेतून आंदोलन करण्याला मला मर्यादा होत्या. मात्र, शिवसेनेच्या माध्यमातून काम करायला मर्यादा नाहीत. युवा वर्गासाठी उद्योग प्रशिक्षण व उद्योग संधी निर्माण करणे हा माझा ध्यास आहे. तसेच उच्च पदावरील अधिकारी निर्माण करण्यासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या स्पर्धा मार्गदर्शन केंद्रांना मदत करणार आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने धनधांडग्यांना बाजूला करून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार केले आहे. या संधीचे सोने करण्यासाठी तालुक्यातील शेतीमालाला भाव, शेतकऱ्यांचा सन्मान, महिलांना रोजगाराची संधी, युवकांना नोकरी व शिक्षणातून विकास साधणार आहे. तालुक्यातील क्रीडा मंडळे व सांस्कृतिक मंडळांना चालना देऊन प्रत्येक गाव तेथे व्यायामशाळा यास प्रामुख्याने प्राधान्य देणार आहे. सर्व समाजातील समाजमंदिर सुधारणा, दलित वस्ती सुधारणा, दलित समाजातील युवक व युवतींचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविणे, बांधकाम क्षेत्रातील कामगार, बारा बलुतेदार, स्थानिक कारागीर, वीट भट्टीवरील कामगार यांच्यासाठी शासनाच्या योजनेतून अनुदानित योजनेचा लाभ व्हावा यासाठी खास प्रयत्न राहील.
मी शेतकरी संघटनेत किती तळमळीने काम केले आहे, हे तालुक्यासह जिल्ह्याने पाहिले आहे. याच तळमळीने आता तालुक्यातील प्रश्न सोडविणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास रास्त भाव मिळवून देऊन माल विक्री व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न, शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या दूध व्यवसाय, कुक्कुटपालन व मेंढपाळ अशा अनेक व्यवसायाच्या वृद्धीसाठी प्रयत्न, महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास मदत, मतदारसंघातील सर्व रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने सुसज्ज करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तालुक्यात असणाऱ्या ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांचा दर्जा सुधारणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन आरोग्य सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार आहे. जनतेला स्वच्छ, शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा देण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करणार तसेच सध्या जीवन प्राधिकरणाकडे असणाऱ्या योजनात कार्यक्षमता व शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करणार. तालुका निर्मलग्राम करण्यासाठी खास प्राध्यान्य देणार आहे.
मी बोलणारा नाही तर करून दाखविणारा आहे, तालुक्यातील सर्व प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्यासाठी झटणार आहे.
(उद्याच्या अंकात आमदार राजेश क्षीरसागर)

उसाचा पहिला हप्ता जास्तीत जास्त मिळण्यासाठी प्रयत्न

महिला सबलीकरणासाठी तालुक्यातील सर्व महिला बचत गटांचा महासंघ स्थापन करून शासनाच्या विविध माध्यमातून अर्थसाहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्न राहील

मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांचा तसेच श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री दत्त
भोजनपात्र, कोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)चा तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेतून विकास करून भाविकांच्या सर्व सोयी-सुविधा देण्यावर भर राहील.


समाजातील उपेक्षित व गरीब घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ सेवा योजना, शेतमजुरांना पेन्शन, आदी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून घेण्याबरोबरच या योजनेतून आजपर्यंत झालेली लुबाडणूक किमान या पुढील काळात होणार नाही, याची नक्कीच खबरदारी घेणार आहे.

सर्व समाजातील बेघरांना आपले हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शासनाच्या योजनेतून प्रयत्न करणे, शासकीय, निमशासकीय, महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जास्तीजास्त मासिक पेन्शन मिळवून देण्यास शासन दरबारी प्रयत्न राहील.



शिरोळ-नृसिंहवाडी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शिरोळ-कुरूंदवाड जुना रस्ता दुपदरीकरण, कुरूंदवाड-शिरढोण दरम्यानचा पूल उंच व भरीव करणे, कवठेसार-कवठेपिरान रस्ता मजबुतीकरण, शिरोळ कल्लेश्वर तलाव पर्यटनस्थळ बनविण्यासाठी प्रयत्नशील. तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्नही मार्गी लावणार आहे. राजापूर येथे पर्यायी बंधारा उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.


तालुक्यात ऊस पीक जास्त असल्यामुळे उसाला पहिला हप्ता जास्तीत जास्त मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, इतर पिकाला हमीभाव मिळावा, भाजीपाला, फुले यासाठी कोल्ड स्टोअरेज निर्माण करणे यासाठीही पुढाकार घेणार आहे.

Web Title: Dream of change of Shirol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.