‘कोरोना’प्रतिबंधक आराखडा करा, प्रबोधनावर भर द्या : जिल्हा प्रशासनाला व्हीसीद्वारे दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:25 PM2020-03-14T12:25:21+5:302020-03-14T12:30:00+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेली दक्षता आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला.

Draw a 'corona' constraint, emphasizing enlightenment | ‘कोरोना’प्रतिबंधक आराखडा करा, प्रबोधनावर भर द्या : जिल्हा प्रशासनाला व्हीसीद्वारे दिल्या सूचना

‘कोरोना’प्रतिबंधक आराखडा करा, प्रबोधनावर भर द्या : जिल्हा प्रशासनाला व्हीसीद्वारे दिल्या सूचना

Next
ठळक मुद्दे विभागीय आयुक्तांच्या सूचना जिल्ह्यात विलगीकरण व अलगीकरण कक्ष तयार

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक आराखडा तत्काळ तयार करून त्यानुसार आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर हाती घ्या, खास करून प्रबोधनावर जास्त भर द्या, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज जिल्हा प्रशासनाला व्हीसीद्वारे दिल्या. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात विलगीकरण व अलगीकरण कक्ष सुसज्ज ठेवण्यात आल्याचे सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेली दक्षता आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथकलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र, आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. प्रतिबंधक आराखडा तयार करताना सर्व बारीकसारीक बाबींचा समावेश करावा. यात विलगीकरण कक्ष तसेच अलगीकरण कक्ष, आवश्यक वैद्यकीय साधणे, नियंत्रण कक्ष याबरोबरच प्रबोधन आणि जनजागृतीचा समावेश करावा. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष आणि सजग रहावे.

जिल्ह्यात शासकीय तसेच महापालिका आणि खासगी हॉस्पिटलच्या सहकार्याने ९८ विलगीकरण बेड तयार करण्यात आले असून, ६० जणांची व्यवस्था असणारा अलगीकरण कक्षही तैनात केला असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. नगरपालिका कार्यक्षेत्रातही १५ बेडचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जिल्ह्यात घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याचे प्रबोधन केले जात असल्याचे सांगून शाळा, महाविद्यालयांतील स्नेहसंमेलने स्थगित करण्याचे आवाहनही केले. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत केला आहे.

सर्व यंत्रणा सजग ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, शहरात महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम अधिक गतिमान करण्यात आली असून सार्वजनिक स्वच्छतेबरोबर वैयक्तिक स्वच्छतेबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रबोधनावर भर द्या
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी गावागावांत आणि वॉर्डा-वॉर्डामधून प्रभावी प्रबोधन आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. यामध्ये प्रामुख्याने व्हिडीओ क्लिप, होर्डिंग्ज, पोस्टर्स, हँडबिल यासह सर्व प्रसारमाध्यमांबरोबरच समाजमाध्यमामधूनही जनजागृती करावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

बनावट मास्क व सॅनिटायझर विक्रीवर नियंत्रण
जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपासून कोरोनाबाधित देशातून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या ५० पर्यटक/ नागरिकांची माहिती घेऊन स्क्रीनिंग करून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. दोनजणांचे सॅम्पल पाठविण्यात आले होते ते निगेटीव्ह आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोगस सॅनिटायझर बाजारात येणार नाहीत, यादृष्टीने अन्न-औषध प्रशासनाला सूचना दिल्या असून, बनावट सॅनिटायझर तसेच मास्कची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

सुट्टीच्या दिवशीही मुख्यालयातच
जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सुट्टीच्या दिवशीही कार्यरत ठेवण्यात येणार असून, सर्व संबंधित यंत्रणेतील अधिकारी- कर्मचाºयांनी शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही आपले मुख्यालय सोडू नये, अशी सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

अफवा पसरवणा-यांवर गुन्हे दाखल होणार
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, यादृष्टीने काळजी घेतली जात आहे. खोडसाळपणे समाजमाध्यमांमधून अफवा पसरविणा-यांवर सायबर सेलची करडी नजर असून, अशा अफवा पसविणा-यांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा त्यांनी इशारा दिला.

 

Web Title: Draw a 'corona' constraint, emphasizing enlightenment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.