नाटक समाजपरिवर्तनाचे एक सशक्त माध्यम
By Admin | Updated: August 19, 2015 00:13 IST2015-08-19T00:13:59+5:302015-08-19T00:13:59+5:30
मंजुल भारद्वाज : नाट्यलेखन कार्यशाळेचा समारोप

नाटक समाजपरिवर्तनाचे एक सशक्त माध्यम
कोल्हापूर : आता नाटकांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जाते. खरंतर ते समाजपरिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे. कोणतीही कला किंवा कलाकार हे वस्तू नाहीत, तर अभिव्यक्ती व्यक्त करणारी जिवंत माणसे आहेत. त्यांच्या माध्यमातून आदिम काळापासून सुुरू असलेल्या शोषणपद्धतीवर प्रहार करत समाजपरिवर्तन करणे हे ‘थिएटर आॅफ रिलेव्हन्स’चे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन मंजुल भारद्वाज यांनी केले.भारतीय जीवनशैलीतील शोषणपद्धतीवर भारतीय जननाट्य संघ, थिएटर आॅफ रिलेव्हन्सच्यावतीने आयोजित नाट्यलेखन कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी लेखक व दिग्दर्शक मंजुल भारद्वाज, कलाकार अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर यांनी या चळवळीमागील भूमिका विशद केली. बिंदू चौक येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या चर्चात्मक कार्यक्रमात टीव्ही कलाकार अश्विनी नांदेडकर व कोमल खामकर म्हणाल्या, टी.व्ही. या ग्लॅमरस क्षेत्रात काम करताना एक कलाकार म्हणून तुमची घुसमट होते. स्वत:चे व्यक्तिमत्त्व हरवून काम करत राहावे लागते. या अस्वस्थतेतून बाहेर पडत कलेचे समाधान मिळविण्यासाठी ‘थिएटर आॅफ रिलेव्हन’ हे योग्य व्यासपीठ आहे. येथे कलेसाठी कला, कलेतले समाधान, व्यक्तिमत्त्वातला बदल आणि समाजपरिवर्तनाचे कार्य करत स्वत:चे वेगळेपण जपता येते. त्यामुळे अनेक व्यावसायिक नाटके नाकारत आणि या रंगभूमीवर स्वत:चे योगदान देत आहोत.
मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. या नाट्यलेखन कार्यशाळेत अनघा देशपांडे, तुषार म्हस्के, पंकज धुमाळ, हृषीकेश पाटील, प्रियांका राऊत यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास ‘छेडछाड का’ नाटकाचे कलाकार, रिंगण नाट्य चळवळीतील कार्यकर्ते व आयटक कामगार केंद्राचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)