नाट्यरसिकांना नाटकांची मेजवानी
By Admin | Updated: November 12, 2014 00:40 IST2014-11-12T00:30:22+5:302014-11-12T00:40:14+5:30
राज्य नाट्य स्पर्धा : तीन वर्षांत प्रथमच १८ संघांचा सहभाग

नाट्यरसिकांना नाटकांची मेजवानी
कोल्हापूर : विविध कारणांमुळे दहा वर्षांत मरगळलेल्या कोल्हापूरच्या नाट्यसृष्टीने, हौशी व प्रायोगिक रंगभूमीने आता कात टाकली आहे. राज्य नाट्य स्पर्धेत तिसऱ्या वर्षी प्रथमच कोल्हापूर केंद्रावर १८ संघांनी नोंदणी केली असून त्यात सिंधुदुर्ग, बेळगांव संघांचाही समावेश आहे. आपल्या नाटकाचे दर्जेदार सादरीकरण व्हावे यासाठी सर्व नाट्यसंस्थांनी तालमींवर जोर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेत रंगत येणार आहेच, शिवाय नाट्यरसिकांना विविध विषयांवर आधारलेल्या नाटकांचा अनुभवही घेता येणार आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर २०१२ मध्ये कोल्हापूरला राज्य नाट्य स्पर्धेचे प्राथमिक केंद्र म्हणून मान्यता मिळाली. पहिल्या वर्षी १०, दुसऱ्या वर्षी १२ संघांनी यात सहभाग नोंदविला होता. यंदा मात्र स्पर्धेत उतरलेल्या संघांची संख्या १८ वर गेली आहे. यातील काही संहिता जुन्याच तर काही संस्था नव्या संहितेचा नवा प्रयोग रंगमंचावर सादर करणार आहेत. त्यामुळे त्याविषयी उत्सुकता आहे.
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र (ट्रिपल सीट), गायन समाज देवल क्लब (प्रियांका आणि दोन चोर), सुगुण नाट्यकला संस्था (नटसम्राट), प्रतिज्ञा नाट्यरंग (किरवंत), प्रत्यय (क्राईम अॅन्ड पनिशमेंट), श्री हनुमान तरुण मंडळ (लव्ह इथले भयकारी), पदन्यास कलाअकादमी (चिताई), परिवर्तन कला फौंडेशन (कावळा आख्यान) अशा कोल्हापुरातील नावाजलेल्या नाट्य संस्थांसह सिंधुदुर्गमधील अक्षरसिंधु साहित्य कलामंच (तर्पण), वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान (एक दिवस मठाकडे), बेळगावमधील बरेकर नाट्य संस्था (वेडिंग अल्बम), कोल्हापुरातील शालिनीदेवी चिंतामणी कापसे प्रतिष्ठान (एकच प्याला), जयसिंगपूरमधील नाट्य शुभांगी (टू इज कंपनी), आजऱ्याचे नवनाट्य मंडळ (तमसो मा), हातकणंगलेतील रंगयात्रा नाट्यसंस्था (ती रात्र) या १८ संस्था राज्य नाट्यस्पर्धेमध्ये सादरीकरण करणार आहेत.
येत्या १७ तारखेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी आता सर्वच संस्थांच्या तालमींना वेग आला असून बॅकस्टेज आर्टिस्ट, पार्श्वसंगीत, नेपथ्य, मेकअप, वेशभूषा, रंगभूषा, प्रकाश योजना यांची सर्व तयारीसाठी धावपळ सुरू आहे. (प्रतिनिधी)
शासकीय संस्थांची नोंदणी
गेल्या काही वर्षांत राज्य नाट्यमधून एक्झिट घेतलेल्या स्थापत्य बांधकाम विभाग (नाटक मी माझ्या मुलांचा), एस. टी. नाट्यसंघ (एक कप चहासाठी), कुंभी-कासारी बहुद्देशीय शेतकरी मंडळ (ता. पन्हाळा) (टुडे इज अ गिफ्ट), महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अशा शासकीय व अशासकीय संस्थांनीही यंदा सहभाग नोंदवला आहे.
नवोदितांना संधी
राज्य नाट्यमध्ये सादर होणाऱ्या बहुतांशी संहिता जुन्या असल्या तरी त्यांचे रंगमंचीय सादरीकरण करणारे कलाकार तरुण आहे. गतवर्षी रंगभूमीवर वाढलेल्या मुलींच्या टक्क्यांबरोबरच नवी पिढी पुन्हा एकदा प्रायोगिक रंगभूमीकडे वळल्याचे सकारात्मक चित्र आहे.