ड्रेनेजलाईन झाली ब्लॉक

By Admin | Updated: July 6, 2014 00:12 IST2014-07-06T00:10:53+5:302014-07-06T00:12:55+5:30

रंकाळ्याचं दुर्भाग्यच : खरमाती अडकली; उद्यापासून शोधमोहीम

Drainage line blocked | ड्रेनेजलाईन झाली ब्लॉक

ड्रेनेजलाईन झाली ब्लॉक

कोल्हापूर : मराठीत ‘नकटीच्या लग्नात सतरा विघ्न’ अशी एक म्हण आहे. हीच म्हण आता रंकाळा तलावाच्या बाबतीत लागू झाली आहे. तलावात मिसळणारे सांडपाणी वळविण्यासाठी टाकण्यात आलेल्या व कालच, शुक्रवारी उद्घाटन झालेल्या ९०० एमएम जाडीच्या जलवाहिनीत दगड व खरमाती अडकल्याने सांडपाणी पुढे सरकत नाही. त्यावर उपाययोजना शोधण्याचे काम सोमवारपासून सुरू होणार आहे.
रंकाळा तलावात शाम हौसिंग सोसायटी भागातून दररोज मिसळणारे ८ ते १० द.ल.घ.मी. सांडपाणी रंकाळा तलावाच्या बाजूने नवीन पाईपलाईन टाकून वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काम सुरू झाले. परंतु पहिल्या दणक्यातच जुना वाशी नाका येथे अत्यंत टणक खडक लागल्याने खुदाई करण्यात प्रचंड वेळ गेला. तोच जावळाचा गणपती ते तांबट कमान या मार्गावर येणाऱ्या ड्रेनेजलाईन, पाणीपुरवठा लाईन, टेलिफ ोन लाईन यामुळे काम अधिकच गुंतागुंतीचे बनले. त्यातून मार्ग काढत हे काम आता कोठे पूर्ण झाले तोवर नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमध्ये दगड, खरमाती अडकल्याचे निदर्शनास आले.
शुक्रवारी पाईपलाईनमधून सांडपाणी वळविण्याचा प्रयत्न झाला, परंतु ज्या क्षमतेने पाणी पुढे सरकायला पाहिजे तेवढ्या क्षमतेने जाईना. आता या पाईपलाईनमधील खरमाती, दगड काढण्याची उपाययोजना पालिकेला करावी लागणार आहे. सध्या महापालिकेकडे अशी मोठ्या आकाराच्या पाईपलाईनमधील खरमाती काढण्यासाठी लागणारे जेट मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी जेट मशीन घ्यावी लागणार आहेत. त्या दृष्टीने विचार सुरू झाला आहे.
दरम्यान, सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन टाकली आहे त्या मार्गावर १००/२०० मीटर अंतरावर मोठी चेंबर्स बांधण्यात आली आहेत. या चेंबरमध्ये काही कर्मचाऱ्यांना आॅक्सीजन मास्क लावून खाली उतरवून अशी खरमाती काढण्याचा प्रयत्न करावा का, याचाही विचार होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Drainage line blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.