प्रारूप प्रभाग रचना पुढील आठवड्यात होणार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:31+5:302020-12-13T04:39:31+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठविला आहे. ...

प्रारूप प्रभाग रचना पुढील आठवड्यात होणार जाहीर
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठविला आहे. आयोग पुढील आठवड्यात प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करणार आहे. प्रभागात नवीन मतदार किती वाढणार यासाठी इच्छुकांच्या नजरा लागून आहेत.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत. तातडीने त्यांनी महापालिका प्रशासनाकडे प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाची मागणी केली. त्यानुसार महापालिकेच्या प्रशासनाने शुक्रवारी आयोगाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाची तपासणी आयोगाकडून होऊन पुढील आठवड्यात प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. यावर हरकती, सूचना घेतल्या जाणार असून सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. यानंतर आरक्षण काढणे आणि निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित होणार आहे.
चौकट
दहा प्रभागांबाबत उत्सुकता
वाढलेल्या मतदारांमुळे गतनिवडणुकीच्या तुलनेत प्रारूप प्रभाग रचनेत १० प्रभागांत बदल झाला आहे. हे प्रभाग नेमके कोणते असणार याची उत्सुकता लागून आहे. हे वाढीव मतदार कोणाच्या पथ्यावर पडणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. सर्वाधिक उपनगरांतील प्रभागांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.
राजकीय टोलेबाजी रंगली
महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच शहरात राजकीय टोलेबाजी रंगली आहे. सर्वच पक्षांतील नेते ॲक्टिव्ह झाले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. काही पक्षांतील अंतर्गत वादही या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.