‘युवक कल्याण’ला नियोजन विभागाचा खोडा

By Admin | Updated: April 3, 2015 23:54 IST2015-04-03T23:38:26+5:302015-04-03T23:54:49+5:30

अनुदान रोखले; शनिवारी क्रीडाधिकाऱ्यांना निवेदन; ३२ संस्थांचे नुकसान

Draft the Planning Department for 'Youth Welfare' | ‘युवक कल्याण’ला नियोजन विभागाचा खोडा

‘युवक कल्याण’ला नियोजन विभागाचा खोडा

सांगली : जिल्ह्यात वर्षानुवर्षे सुरळीत सुरू असलेल्या युवक कल्याण योजनेत यंदाच्यावर्षी ‘लोचा’ झाला आहे. या योजनेतील बत्तीस पात्र संस्थांचे अनुदान रोखल्यामुळे क्रीडा संस्था आक्रमक झाल्या आहेत. जिल्हा नियोजन विभागाने त्रुटींची पूर्तता करूनही अनुदान रोखल्याने, संस्था लाभापासून वंचित राहणार आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे युवक कल्याणविषयक प्रकल्प राबविण्यासाठी नोंदणीकृत संस्था किंवा मंडळास २५ हजाराचे अनुदान मिळते. खुल्या प्रवर्गातील संस्थांसाठी जिल्हा नियोजन समितीने आठ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडे ३२ संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून क्रीडाधिकाऱ्यांनी हे प्रस्ताव क्रीडा उपसंचालक यांच्याकडे पाठवले. क्रीडा उपसंचालकांनी तांत्रिक मान्यता देऊन हे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे पाठवले. नियोजन अधिकाऱ्यांनी बऱ्याच प्रस्तावांमध्ये त्रुटी काढल्या. त्रुटी पूर्ण करून द्याव्यात, असे पत्र क्रीडाधिकाऱ्यांना पाठवले. त्यानुसार संस्थांनी त्रुटींची पूर्तताही केली. मात्र तरीही संस्थांना अनुदान मिळाले नाही, अशी माहिती युवक कल्याण अनुदान बचाव संषर्घ समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
प्रशासनाच्या या डोळेझाकीविरूध्द जिल्ह्यातील बत्तीस पात्र संस्थांची बैठक सांगली एनजीओ फोरमच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत, संस्थांवर झालेल्या अन्यायाविरूध्द लढा देण्याचे ठरले. यासाठी युवक कल्याण अनुदान बचाव संषर्घ समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी महादेव दबडे, तर सचिवपदी सुरेश चौधरी यांची एकमताने निवड झाली.
या समितीतर्फे ४ एप्रिलरोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच काळ्या फिती लावून घेरावही घालण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Draft the Planning Department for 'Youth Welfare'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.