शिर्के परिवाराने जपल्यात डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:22+5:302020-12-06T04:27:22+5:30
संदीप आडनाईक लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापरिनिर्वाणदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर ...

शिर्के परिवाराने जपल्यात डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी
संदीप आडनाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापरिनिर्वाणदिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायी जात असतात. कोल्हापुरातील शिर्के परिवार मात्र मुंबईस न जाता ते आपल्या निवासस्थानीच जपून ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थींचे पूजन करतात. यंदा कोरोनामुळे चैत्यभूमीवर जाता न येणाऱ्यांसाठी हे रक्षापात्र बिंदू चौकात आज, रविवारी सकाळी १०.३० वाजता दर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय शिर्के परिवाराने घेतला आहे.
माजी आमदार, दलितमित्र दादासाहेब मल्हारराव शिर्के हे डॉ. आंबेडकर यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले. दुसऱ्या दिवशी मुंबईत चैत्यभूमीवर बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी देशभरातून आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह दादासाहेबही चैत्यभूमीत गेले.
रक्षाविसर्जनानंतर बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव यांनी बाबासाहेबांची रक्षा असलेले पात्र दादासाहेबांकडे सुपूर्द केले होते. परत आल्यानंतर २३ डिसेंबर १९५६ रोजी हजारो अनुयायांच्या उपस्थितीत दादासाहेबांनी कोल्हापुरातून त्याची मिरवणूक काढली होती. चांदीचा राजहंस तयार करून त्याच्या पोटात दादासाहेबांनी या अस्थी जपून ठेवल्या आणि खास पेटीही तयार करवून घेतली.
-------------------------------
शिर्के परिवाराकडून अस्थींचे पूजन
डिसेंबर १९८६ मध्ये दादासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र वसंतराव शिर्के यांनी सिद्धार्थनगर येथील निवासस्थानी हे रक्षापात्र जपून ठेवले. एप्रिल १९९७ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी वसुधा आणि अलका, सविता, राणी, पुष्पा आणि मल्हार ही पाच भावंडे या अस्थींचे पूजन करतात, ते आजतागायत सुरू आहे.
-------------------------------
गर्दी न करता दर्शन घेण्याचे आवाहन
यंदा कोरोनामुळे प्रत्यक्ष चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केल्यामुळे शिर्के परिवाराने बाबासाहेबांच्या अस्थींचे हे रक्षापात्र आज, रविवारी सकाळी १०.३० वाजता ऐतिहासिक बिंदू चौकात डॉ. आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यासमोर अल्पकाळासाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. गर्दी न करता नियम पाळून या अस्थींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, महासचिव तकदीर कांबळे यांनी केले आहे.
------------------------
फोटो : 0५कोल्हापूर ०४ व ०५
कोल्हापुरातील सिद्धार्थनगर येथील वसुधा शिर्के यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी चांदीच्या राजहंसाच्या पोटात जपून ठेवल्या आहेत.