देवस्थान समितीच्या अध्यक्षपदात रस नाही डॉ संजय पाटील यांचे स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST2021-04-10T04:23:56+5:302021-04-10T04:23:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेली तीस वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात काम करत आहे. ...

देवस्थान समितीच्या अध्यक्षपदात रस नाही डॉ संजय पाटील यांचे स्पष्टीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेली तीस वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे मला राजकीय क्षेत्रातील कोणत्याही पदावर काम करण्याची इच्छा नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर काम करण्यातसुद्धा मला रस नाही. माझ्या अन्य जबाबदाऱ्यांमुळे या पदाला योग्य न्याय देता येणार नाही, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे दिली.
देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव स्पर्धेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्टीकरण केले आहे. पत्रकात ते म्हणतात, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत १९८८ पासून कार्यरत आहे. या शिक्षण संस्थेचा विस्तार करत असताना अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्याचबरोबर कृषी हा सुद्धा आवडीचा विषय असल्याने तळसंदे येथे स्वायत्त कृषी विद्यापीठ उभारणीच्या कामास सध्या प्राधान्य दिले आहे. असे असताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी अचानक माझे नाव चर्चेत असल्याचे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने स्वत:चे राजकीय आडाखे बांधून माझे नाव प्रसिद्ध केले असावे, असे मला वाटते; पण मला देवस्थान समितीचे अध्यक्षपद हवे, अशी इच्छा आजपर्यंत कोणासमोरही व्यक्त केलेली नाही किंवा त्यासाठी कधी प्रयत्नही केलेले नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असण्याचा प्रश्नच येत नाही.