हसुर खुर्द येथील डॉ. सुप्रिया पाटील यांची जागतिक संशोधकांच्या यादीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:42+5:302021-07-14T04:27:42+5:30
सेनापती कापशी : हसुर खुर्द (ता. कागल) येथील डॉ. सुप्रिया अंकुश पाटील यांची जगभरातील संशोधकांच्या यादीत निवड झाली आहे. ...

हसुर खुर्द येथील डॉ. सुप्रिया पाटील यांची जागतिक संशोधकांच्या यादीत निवड
सेनापती कापशी : हसुर खुर्द (ता. कागल) येथील डॉ. सुप्रिया अंकुश पाटील यांची जगभरातील संशोधकांच्या यादीत निवड झाली आहे. चिकोत्रा खोऱ्यातील हसुर खुर्द या लहानशा खेडेगावात जल्मलेल्या या कन्येने ‘नॅनो टेक्नॉलॉजी’वर आधारित संशोधन करून मिळवलेल्या या यशाने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
डॉ. पाटील या सध्या दक्षिण कोरियामधील सेजोंग विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाने नुकतीच ए. डी. सायंटिफिक इन्डेक्स म्हणजेच जगभरातील नामांकित संशोधकांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये डॉ. सुप्रिया पाटील यांना स्थान मिळाले आहे.
कागल तालुका संघाचे संचालक व हसुर खुर्दचे माजी सरपंच अंकुश पाटील यांच्या त्या कन्या होत. डाॅ. सुप्रिया यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील शाळेतच पूर्ण झाले. त्यांनी अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात रसायनशास्त्र विषयात पदवी संपादन केली. शिवाजी विद्यापीठामधून एम. एस्सी.ची पदवी घेतली. येथूनच त्यांची दक्षिण कोरियातील हनयांग युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेटसाठी निवड झाली होती.
१८१ देशांतील १० हजार ६५५ विद्यापीठांतील ५ लाख ६५ हजार ५५३ संशोधकांमधून ‘वर्ल्ड सायंटिस्ट ॲन्ड युनिव्हर्सिटी रॅन्किंग २०२१’ जाहीर केले आहे. पाणी आणि ऊर्जा यांची भविष्यात निर्माण होणारी टंचाई व यावर मात करण्यासाठी डॉ. पाटील यांनी संशोधन करून प्लॅटिनमऐवजी इतर धातूंचा वापर केला. पाणीटंचाई व ऊर्जा निर्मितीसाठी नवा पर्याय समोर आणावा लागेल, हा विचार करून डॉ. पाटील यांनी संशोधन केले. ही प्रक्रिया कमी खर्चिक व सोपी झाली आहे.
डॉ. पाटील यांना वडील अंकुश पाटील, पती डॉ. दिलीप पाटील, भाऊ महेशकुमार पाटील व अजिंक्य पाटील, बहीण ऐश्वर्या पाटील यांचे प्रोत्साहन व हनयांग विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रोफेसर सुंग व्हान हन यांचे मार्गदर्शन लाभले.