कोल्हापूर : ‘अंगणास या करू नये रे कधी रणांगण, विसरून जावे माजघरातच आपले भांडण’ ही नरहर कुलकर्णी यांची गझल असो किंवा राजश्री सूर्यवंशी यांची, ‘जीव वेडा वाट पाही त्या क्षणांची सारखी, अंगणी चाहूल आता माणसांची पारखी’ ही गझल असाे. यासारख्या गजलांनी गझलसाद समूहाच्यावतीने रविवारी आयोजित मुशायऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
डॉ. संजीवनी तोफखाने यांनी, ‘ध्येयवेड्या माणसांची आज आहे वानवा, ज्ञानवादी ज्ञातकांची आज आहे वानवा, अशी सुरुवात केली. प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांनी, ‘ कधीतरी तू प्रियकर हो ना सहज म्हणाले, अवचित येऊन जवळी घे ना सहज म्हणाले’ अशी प्रेमभावना व्यक्त केली. सारिका पाटील यांनी, ‘झुंज द्यायची आहे, खडतर बाकी काही नाही,’ अशा प्रभावी रचना सादर केल्या.
अशोक वाडकर यांनी, ‘किती कथा या शहराच्या, किती? व्यथा या शहराच्या’ असे वास्तव मांडले. प्रवीण पुजारी यांनी, ‘कोणाच्याही खांद्यावर मी ओझे ठेवत नाही’. डॉ. दयानंद काळे यांनी, ‘घेऊन सोंग आता झोपायचे किती?, समजून धर्म अफूला मी प्यायचे किती? प्रसाद कुलकर्णी यांनी ‘हीच सदिच्छा उरी जपावी नवीन वर्षी ,स्नेहफुलांची बाग फुलावी नवीन वर्षी , अशी रचना सादर करत मानवता व गझल यांचे नाते बळकट होवो, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी हेमंत डांगे यांनी मराठी व उर्दू गझल सादर केल्या. प्रथमेश गंगापुरे यांनीही रचना सादर केली. नागेशकर सभागृहात झालेल्या या मैफलीला सुभाष नागेशकर ,वरुणा कुलकर्णी, अभय वाडकर यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.
०४०१२०२१ कोल गझलसाद
येथील गझलसाद समूहाच्या मुशायऱ्यावेळी गझलकारांनी उपस्थित राहून उत्तम गझलांचे सादरीकरण केले.