उत्तरकार्यानिमित्त ५००१ शेणी दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:36+5:302021-05-20T04:25:36+5:30
भुदरगड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि हणबरवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच धनाजीराव खोत यांच्या अकाली निधनाने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

उत्तरकार्यानिमित्त ५००१ शेणी दान
भुदरगड तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि हणबरवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच धनाजीराव खोत यांच्या अकाली निधनाने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या उत्तरकार्याच्या दिवशी हणबरवाडी (ता. भुदरगड) गावच्या ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने सामाजिक भान जपत पंचगंगा वैकुंठ स्मशानभूमीस ५००१ गोवऱ्या (शेणी) दान केल्या. सरपंच धनाजीराव खोत यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
लोकनियुक्त सरपंच धनाजीराव खोत यांचे अकाली निधन झाले. गावच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावातील प्रत्येक व्यक्ती, कुटुंबाची आस्थेने काळजी करणाऱ्या युवा नेत्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपण्याचा निर्णय ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी घेतला. गावकऱ्यांनी गोवऱ्या संकलित करून आज त्यांच्या उत्तरकार्यादिवशी पंचगंगा वैकुंठ स्मशानभूमीस ५००१ गोवऱ्या (शेणी) दान केल्या. यावेळी गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते गोवऱ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचे पूजन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक अमित देशमुख, हणबरवाडीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.