मराठा सांस्कृतिक भवनास निधी द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:20+5:302021-07-21T04:18:20+5:30
यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथील खासगी जागेवर शासकीय निधीतून कामे होत असल्याने व मराठा सांस्कृतिक भवनच्या ...

मराठा सांस्कृतिक भवनास निधी द्या !
यड्राव : जांभळी (ता. शिरोळ) येथील खासगी जागेवर शासकीय निधीतून कामे होत असल्याने व मराठा सांस्कृतिक भवनच्या कंपाउंड कामासाठी ग्रामपंचायकडून निधी दिला जात नसल्याने मराठा समाजातील सदस्यांनी सरपंच खंडू खिलारे याना धारेवर धरत ग्रामपंचायतीत ठिय्या मारला. निधी मिळण्याचा आश्वासनानंतर समाजबांधव शांत झाले.
जांभळी येथे मराठा समाजाचे सांस्कृतिक भवन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निधीतून उभारण्यात येत आहे. सांस्कृतिक भवनाच्या कंपाउंडसाठी ग्रामपंचायतीकडून निधीची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु सांस्कृतिक भवनाच्या नजीक असलेल्या एका खासगी क्रीडा मंडळास ग्रामपंचायतीच्या निधीतून कंपाउंडचे काम सुरू असल्याचे मराठा समाजबांधवांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने ते संतप्त झाले. त्यांनी ग्रामपंचायतीत येऊन सरपंचांना धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला. निर्णय झाल्याशिवाय येथून न जाण्याची भूमिका घेतली.
या वेळी खासगी जागेवर शासकीय निधी खर्च होत आहे, तर सामाजिक कार्यासाठी निधी प्राप्त होत नाही. ही बाब सरपंचांसह उपस्थित सदस्यांच्या निदर्शनास आणून दिली व सांस्कृतिक भवन जागेतील अतिक्रमण काढणे, कंपाउंडसाठी निधी व वाढीव जागेची मागणीवर मराठा समाज ठाम राहिला. सुमारे दोन तासांहून अधिक वेळ समाजबांधवांनी ग्रामपंचायतीतच ठिय्या मारला. ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीत यावर योग्य तोडगा काढून निधी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतर समाजबांधव शांत झाले.
फोटो - २००७२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - जांभळी (ता. शिरोळ) येथील मराठा समाज सांस्कृतिक भवनाच्या निधीच्या मागणीवरून ग्रामपंचायतीत समाज बांधवांची समजूत काढताना नेते मंडळी.