कोल्हापूर : अलमट्टी धरणातील फूग वाढल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागते. त्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत. पाटबंधारे विभागाचे अधिकारी केवळ कागदोपत्री आकडेवारी सरकारकडे पाठवितात. आकडेवारीचा खेळ करून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळत आहे. महापुराने आता नाकातोंडात पाणी चालले आहे, असा घणाघाती आरोप करीत कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या पाटबंधारे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना बुधवारी येथे झालेल्या बैठकीत चांगलेच धारेवर धरले. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार राजू शेट्टी हे प्रमुख उपस्थित होते.
अलमट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती, कोल्हापूर, सांगली आणि साताराच्या वतीने बुधवारी शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. तुम्हाला काही मर्यादा असतील, तर आम्ही केंद्र आणि राज्य सरकारसोबत संघर्ष करू, असा इशाराही बैठकीत दिला.
महापुरामुळे कोल्हापूर, शिरोळ, सांगली जिल्ह्यांतील पिके कुजतात. त्यासाठी काहीही ठोस उपाययोजना केलेली नाही. महापुरापासून बचावासाठी उद्योग, व्यवसाय स्थलांतरित करता येतात. मात्र, शेती स्थलांतरित करता येत नाही. महापुरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवन- मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप समितीच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत केला.सांगलीचे अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी हिप्परगी धरणाच्या विसर्गाची माहिती दिली. तीन शिफ्टमध्ये आठ अधिकारी कार्यरत असून, करडी नजर ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी धरणातून सोडल्या जाणाऱ्या विसर्गाचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, अलमट्टीसंदर्भातील प्रश्न आपल्याला वाढवायाचा नाही, तर कायमस्वरूपी सोडवायचा आहे. सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. जनता आणि सरकारची समन्वय समिती झाली पाहिजे. त्यांनी याप्रश्नी जनतेला निमंत्रित करावे.माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, महापूर आला तरी लवकर ओसरत नाही. पाण्याच्या गतीला अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. ठिकठिकाणी टाकलेले भरावही कारणीभूत आहेत. त्यासाठी एक ठोस कृती आराखडा तयार करावा. केंद्रीय जलसंधारणमंत्री आणि केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष, महाराष्ट्र, कर्नाटकचे अधिकारी यांच्यात बैठक घ्यावी. त्यातून निश्चितच मार्ग निघेल.विजय देवणे म्हणाले, अलमट्टीप्रश्नी पाटबंधारे विभाग अपयशी ठरल्याचे मान्य करावे. याप्रश्नी सर्वपक्षीयांना घेऊन लवकरच पुढील दिशा ठरविली जाईल. समितीचे विक्रांत पाटील, व्ही.बी. पाटील, दिलीप पोवार, बाबासाहेब देवकर, धनाजी चुडमुंगे, बाजार समितीचे संचालक भारत पाटील, सुभाष देसाई, अनिल घाटगे आदींनी मते मांडली. यावेळी कार्यकारी अभियंता स्मिता माने यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आम्हाला काही मर्यादा आहेतबैठकीत संघर्ष समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी प्रश्नांचा भडिमार करताच सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे म्हणाले, आम्हाला काही मर्यादा आहेत. आमचे काम सरकारला अहवाल देण्याचे आहे. आमच्या विभागाने पूर नियंत्रणासाठी प्रयत्न केले आहेत, त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठविली असल्याचे सांगितले.
ही काय देशविरोधी माहिती आहे का?अभियंता पाटोळे यांनी दिलेल्या माहितीवर माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, अलमट्टीची उंची आणि पाटबंधारे विभागाने केलेले काम, याची माहिती देणे गरजेचे आहे. यात गोपनीय काय आहे, ही काय देशविरोधी माहिती आहे का, तुम्ही त्यातील तज्ज्ञ आहात, आंतरराज्य समन्वयक आहात, तुम्हीच असे बोलला, तर आम्ही कोणाकडे जायचे.